अपघातात चार कामगार ठार

By Admin | Updated: April 30, 2016 02:58 IST2016-04-30T02:58:03+5:302016-04-30T02:58:03+5:30

कामगारांना घेऊन जात असलेली भरधाव कार रोडच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रेलरवर आदळली.

Four workers killed in accident | अपघातात चार कामगार ठार

अपघातात चार कामगार ठार

बुटीबोरी एमआयडीसीतील घटना : उभ्या ट्रेलरवर कार आदळली
बुटीबोरी : कामगारांना घेऊन जात असलेली भरधाव कार रोडच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रेलरवर आदळली. त्यात तिघांचा घटनास्थळीच तर एकाचा उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
अनिल व्यंकटेश बरगट (४६, रा. बुटीबोरी), राकेश रामभोज वर्मा (४०, रा. बुटीबोरी), शुभम विठ्ठलराव भोडवे (२३, रा. माळेगाव, ता. आर्वी, जिल्हा वर्धा) व एस. राजकुमार (२८, रा. चेन्नई, तामिळनाडू) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हे सर्व कामगार बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील शिल्पा स्टील नामक कंपनीमध्ये कार्यरत असून, बुटीबोरी येथे राहायचे. ते गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे एमएच-३१/सीएस-४१५० क्रमांकाच्या कारने कंपनीत कामावर जाण्यासाठी बुटीबोरीहून एमआयडीसीत जात होते. त्यातच ट्रेलरचालकाने सीजी-०४/जी-६४४४ क्रमांकाचा ट्रेलर रोडच्या मध्यभागी उभा केला आणि कामानिमित्त निघून गेला. त्यावेळी चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने या ट्रेलरच्या सभोताल कुठलीही उपाययोजना केली नव्हती. दरम्यान, जवळ आल्यावर समोर ट्रेलर उभा असल्याचे कारचालकाच्या निदर्शनास आले. त्याने कारवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला खरा, पण यश आले नाही. परिणामी, भरधाव कार ट्रेलरवर मागच्या बाजूने आदळली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने अनिल, राकेश व कारचालक शुभम या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेत जखमी एस. राजकुमारला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून ट्रेलरचालकास अटक केली. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद बन्सोड करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Four workers killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.