वेश्याव्यवसायासाठी नेणाऱ्या चार तरुणी सापडल्या
By Admin | Updated: February 3, 2017 02:28 IST2017-02-03T02:28:31+5:302017-02-03T02:28:31+5:30
गंगाजमुनातील तरुणींना वेश्याव्यवसायासाठी नेणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी पकडले.

वेश्याव्यवसायासाठी नेणाऱ्या चार तरुणी सापडल्या
कुंटणखाना चालविणारी गजाआड : दोन फरार
नागपूर : गंगाजमुनातील तरुणींना वेश्याव्यवसायासाठी नेणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातील चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली. आरती अर्जुनसिंग बेडिया (वय ३७, रा. भास्कर बिल्डिंग, गंगाजमुना) आणि शेख युनूस शेख इनायततुल्ला (वय ३०, रा. हसनबाग) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार पळून गेले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्यामुळे गंगाजमुनातील अनेक कुंटणखाने बंद पडले आहेत. अनेक वेश्यांनी वस्ती सोडली असून, काही बाहेरगावाला गेल्या तर काही जणी नागपुरातीलच वेगवेगळ्या वस्तीत राहून वेश्याव्यवसाय करीत आहेत. काही जणी मात्र येथेच राहून ग्राहकांना पाहिजे त्या ठिकाणी मुली पुरवितात. हे लक्षात आल्याने परिमंडळ ३ चे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंजचे ठाणेदार सत्यवान माने, सहायक पोलीस निरीक्षक निळे, महिला उपनिरीक्षक वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला.
एका ग्राहकाच्या मागणीनुसार आरती बेडिया, शशी ठाकूर आणि गुड्डू ठाकूर यांनी चार तरुणींना ग्राहकांकडे पाठविण्याची तयारी केली. यासाठी युनूस नामक दलालाला क्वॉलिस (एमएच १५/ एस ८३४८) कार घेऊन बोलविले. या कारमधून बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी जाण्यासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार तरुणी निघाल्या. दारोडकर चौकाजवळ पोलिसांनी त्यांची कार रोखली. कारमधील सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
तरुणींनी आरती बेडियाच्या सांगण्यावरून वेश्याव्यवसाय करण्यासाठी ग्राहकांकडे जात असल्याचे सांगितले. आरती आणि तिचे साथीदार जबरदस्तीने गंगाजमुनात डांबून ठेवून देहविक्रय करवून घेत असल्याची माहितीही पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी आरती तसेच युनूसला पिटा अॅक्टनुसार अटक केली.
फरार झालेल्या शशी आणि गुड्डू ठाकूरचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)
नियमित खरेदी-विक्री
गंगाजमुनात पोलिसांनी वारंवार कारवाई चालविली असली तरी येथील वेश्याव्यवसाय सुरूच आहे. फसवून आणलेल्या मुलींना येथे नियमित विकले जाते. कुंटणखाना चालविणारे या तरुणींना, लहान मुलींना विकत घेतात. त्यांना या नरकात डांबून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना देहविक्रय करण्यासाठी भाग पाडतात. वेश्याव्यवसायाला नकार देणाऱ्या अथवा पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहान मुली, तरुणींवर अमानुष अत्याचार केले जातात.