चौघांना जामीन नाकारला
By Admin | Updated: January 28, 2015 01:00 IST2015-01-28T01:00:42+5:302015-01-28T01:00:42+5:30
कर्लआॅन कंपनीच्या वाडी शाखेत ५३ लाख ६७ हजार ४०७ रुपये किमतीच्या मालाचा घोटाळा केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने चार आरोपींचा

चौघांना जामीन नाकारला
न्यायालय : ५३ लाखांचा कर्लआॅन घोटाळा
नागपूर : कर्लआॅन कंपनीच्या वाडी शाखेत ५३ लाख ६७ हजार ४०७ रुपये किमतीच्या मालाचा घोटाळा केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने चार आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
एरिया बिझनेस मॅनेजर अनिरुद्ध घारपुरे, अकाऊंटन्ट अजय जोशी, एरिया बिझनेस आॅफिसर पराग नागपूरकर आणि वेअरहाऊस इन्चार्ज बंडू बुराडे, अशी आरोपींची नावे आहेत.
प्रथम खबरी अहवालानुसार या घोटाळ्याची माहिती अशी की, मंगलोर येथे कर्लआॅन एन्टरप्रायजेसचे मुख्यालय आहे. या कंपनीच्या फोम, गाद्या, फर्निचर, पिलो आदी उत्पादनांची संपूर्ण देशात आॅनलाईन पद्धतीने विक्री केली जाते.
या आरोपींनी कंपनीच्या मूळ गोदाम व्यतिरिक्त आणखी एक गोदाम भाड्याने घेतले होते. कंपनीकडून आलेला माल मूळ गोदामात न उतरवता स्वत:च्या गोदामात उतरवून ते त्यांची परस्पर विक्री करीत होते. खासगीरीत्या घेतलेल्या गोदामाचे भाडे थकल्याने गोदाम मालकाने कंपनीकडे विचारणा केली असता हा घोटाळा उजेडात आला. कर्लआॅनचे अंधेरी येथील झोनल अकाऊंटन्ट शितल गुछायीत यांनी २०१४ च्या वार्षिक कारभाराची तपासणी केली असता त्यांना हा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक टाळण्यासाठी आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील नितीन देशमुख यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक शिंदे आणि हेड कॉन्स्टेबल दीपक अवचट तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)