दोन वर्गांसाठी चार शिक्षक
By Admin | Updated: July 13, 2014 01:09 IST2014-07-13T01:09:43+5:302014-07-13T01:09:43+5:30
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या गडचिरोली व अन्य प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कला शाखेच्या इयत्ता अकरावी व बारावी

दोन वर्गांसाठी चार शिक्षक
भोंगळ कारभार : उच्च माध्यमिक शिक्षकांचा कार्यभार अपूर्ण
दिलीप दहेलकर - गडचिरोली
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या गडचिरोली व अन्य प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कला शाखेच्या इयत्ता अकरावी व बारावी या दोन वर्गासाठी चार उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती गेल्या काही वर्षांपासून करण्यात आली आहे. अकरावी व बारावीचे मिळून ६० ते ७० विद्यार्थ्यांसाठी चार शिक्षक कार्यरत असल्याने या शिक्षकांचा कार्यभार पूर्ण होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक वर्षांपासून शासनाला एका उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वेतनापोटी लाखो रूपये खर्च करावे लागत आहे.
गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीनही प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय आश्रमशाळा सुरू आहेत. एकीकडे या शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे अकरावी व बारावी या कला शाखेच्या दोन वर्गांसाठी अतिरिक्त उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली प्रकल्पातील रामगड, कारवाफा, रांगी, सोडे, कोरची, गोडवाही, पेंढरी, रेगडी, येंगलखेडा, कुरंडीमाल या आश्रमशाळेत कला शाखेचे अकरावी व बारावीचे वर्ग सुरू आहेत. यापैकी कोरची, पेंढरी, कुरंडीमाल, येंगलखेडा व रेगडी या ठिकाणी विज्ञान शाखा आहे. या आश्रमशाळांमध्ये सहा ते सात उच्च माध्यमिक शिक्षक कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र ज्या आश्रमशाळेत कला शाखेचे दोन वर्ग आणि केवळ ६० ते ७० पटसंख्या आहे, अशा आश्रमशाळेमध्ये इंग्रजी व मराठी या भाषा विषयांसाठी दोन शिक्षक तर सामाजिकशास्त्र विषयासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या कला शाखेतील इंग्रजी व मराठी भाषेचे शिक्षक अकरावी व बारावीचे मिळून दोनच तास घेतात. यामुळे या शिक्षकांचा कार्यभार पूर्ण होत नाही. सामाजिकशास्त्र विषयासाठी असलेल्या दोन उच्च माध्यमिक शिक्षकांकडे दोन विषयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सदर शिक्षक रोज अकरावी व बारावीचे मिळून दोन विषयाचे चार तास घेतात. या शिक्षकांचा कार्यभार पूर्ण होतो. मात्र अकरावी व बारावीची प्रत्येकी एकच तुकडी असल्याने एकाच विषयाची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांचा दिवसभराचा कार्यभार पूर्ण होत नाही. मात्र यासाठी शासनाला एका अतिरिक्त उच्च माध्यमिक शिक्षकाला दरमहा ५० हजार पेक्षाही अधिक वेतन द्यावे लागत आहे.
जिल्हा परिषद व खासगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी, बारावी या कला शाखेच्या दोन वर्गांसाठी तीन शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. वर्ग व पटसंख्येनुसार तीन शिक्षकांची नियुक्ती नियमाला अनुसरून आहे.