थकित शुल्क न भरल्याने नागपूर मनपाने केली चार दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:35 IST2018-01-11T00:33:35+5:302018-01-11T00:35:21+5:30
थकीत असलेले शुल्क वारंवार सूचना देऊनही न भरल्यामुळे महापालिकेच्या बाजार विभागाने बुधवारी चार दुकानांना सील ठोकले.

थकित शुल्क न भरल्याने नागपूर मनपाने केली चार दुकाने सील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थकीत असलेले शुल्क वारंवार सूचना देऊनही न भरल्यामुळे महापालिकेच्या बाजार विभागाने बुधवारी चार दुकानांना सील ठोकले. नालंदा गोडबोले/तक्षशीला वाघधरे, राजेश प्रभाकर देशमुख, किसन नारायण वासवानी व तुलसीराम वागडे यांच्या दुकानांचा यात समावेश आहे. याशिवाय सहा दुकानदारांनी एकूण १२ लाख ५३ हजार ९६६ रुपये शुल्क भरून आपल्या दुकानांना सील
लागण्यापासून वाचविले.
वापर शुल्क (यूजर) न भरल्यामुळे बाजार विभागाने बुधवारी ही कारवाई केली. सीताबर्डी सुपर मार्केटमधील चार दुकाने, मोदी नंबर २, सीताबर्डी कॉम्प्लेक्स येथील एक दुकान व नेताजी मार्केटमधील सहा दुकानदारांकडे बºयाच दिवसांपासून शुल्क थकीत होते. या दुकानांवर कारवाई करण्यासाठी बाजार विभागाचे पथक पोहोचले असता दुकानदारांचे धाबे दणाणले. कारवाईदरम्यान गेंदराज राऊत यांनी ३ लाख २४ हजार १२९ रुपये, विजय वंजारी यांनी ४ लाख, पूनमचंद वंजारी यांनी २ लाख, राजू येळणे यांनी १ लाख ६६ हजार २३८ रुपये, सचिन निंबूळकर यांनी ९१ हजार २६२ रुपये, हरिभाऊ एन. दारव्हेकर यांनी ७२ हजार ३३७ रुपये जमा करून सील लागण्याची कारवाई वाचविली.
बाजार विभागाचे अधीक्षक सुनील रोटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक नंदकिशोर भोवते, निरीक्षक रमेश शिवणकर, विप्लव धवने, संदीप घोडीचोर, दिलीप भानुशे, भूषण बावनकर, सतीश साखरे, गोपाल मानापुरे आदींनी ही कारवाई केली.