चार अल्पवयीन मुलींची सुटका
By Admin | Updated: July 2, 2014 00:55 IST2014-07-02T00:55:02+5:302014-07-02T00:55:02+5:30
गंगा जमुना परिसरात २० ते २५ अल्पवयीन मुलींकडून देहविक्री करवून घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजता धाड टाकली.

चार अल्पवयीन मुलींची सुटका
नागपूर : गंगा जमुना परिसरात २० ते २५ अल्पवयीन मुलींकडून देहविक्री करवून घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजता धाड टाकली. धाडीत चार अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांना देहविक्रीस भाग पाडणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले. धाडीनंतर एकच धावपळ झाल्याने या भागातील अनेक अल्पवयीन मुली पळून गेल्या.
गंगा जमुनात २० ते २५ अल्पवयीन मुलींकडून देहव्यवसाय करवून घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला पुण्यातील फ्रिडम फर्म संस्थेचे सत्यजीत देसाई, सुरेंद्र सहारे, एंजला एलीस एरम तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुपमा मिश्रा यांनी दिली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार यांनी आपल्या ताफ्यासह गंगा जमुनात धाड टाकली. धाडीत आरोपी जनताबाई ऊर्फ गीता गिराजतेली कर्मावत (५०) हिला चार अल्पवयीन मुलींकडून देहव्यवसाय करवून घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
धाडीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यात देहविक्री करणाऱ्या अनेक अल्पवयीन मुली पळून जाण्यात यशस्वी झाल्या. सामाजिक सुरक्षा विभागाने आरोपी जनताबाई उर्फ गीता गिराजतेली कर्मावत विरुद्ध पीटा अॅक्टनुसार कारवाई केली. त्यानंतर धाडीतआढळलेल्या चारही अल्पवयीन मुलींची सिव्हिल लाईन्सच्या करुणा सुधारगृहात रवानगी करण्यात आली. संदीपसिंग महेशसिंग बैस (३४) रा. भैरीगंज, सिवनी आणि राहुल रमेश लष्करे (२५) रा. खापा ता. सावनेर या दोन ग्राहकांवरही कारवाई करण्यातआली. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त सुनील कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार, सहायक पोलीस निरीक्षक एम. बी. बारापात्रे, एस. एम. पाटील, अमिता जयपूरकर, पांडुरंग निकरे, प्रकाश सिडाम, कमलाकर पाटील, संजय तेलमासरे, गोपाल वैद्य, अजय घाटोड, राजू रोकडे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)