लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर येथील ॲड. मेहरोज अश्रफ खान पठाण, ॲड. राज दामोदर वाकोडे, ॲड. नंदेश शंकरराव देशपांडे व ॲड. रजनीश रत्नाकर व्यास, या चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या सर्वोच्च कॉलेजियमने यासंदर्भात काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारला सादर केलेला प्रस्ताव बुधवारी मंजूर करण्यात आला. ॲड. मेहरोज खान पठाण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये राज्य सरकारचे वकील आहेत, तर ॲड. नंदेश देशपांडे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया (केंद्र सरकार) आहेत. ॲड. राज वाकोडे व ॲड. रजनीश व्यास खासगी वकिली करतात, तसेच ॲड. वाकोडे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ व महावितरण कंपनीचे स्थायी अधिवक्ता आहेत. या चारही विधिज्ञांना वकिली व्यवसायाचा दीर्घ अनुभव आहे. ॲड. वाकोडे २००४, ॲड. देशपांडे १९९७, तर ॲड. व्यास २००१ पासून या व्यवसायात कार्यरत आहेत. यादरम्यान त्यांनी संवैधानिक, दिवाणी, फौजदारी इत्यादी प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत. त्यांची आतापर्यंतची यशस्वी कारकीर्द लक्षात घेता, त्यांना अतिरिक्त न्यायमूर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१४ वकिलांचा समावेशसर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूर येथील चौघांसह एकूण १४ वकिलांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार इतरही वकिलांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये ॲड. संदेश पाटील, ॲड. श्रीराम सिरसाट,ॲड. रणजीतसिंह राजा भोसले, ॲड. आशिष चव्हाण, ॲड. फरहान दुबाश, ॲड. आबासाहेब शिंदे, ॲड. हितेन वेणेगावकर, ॲड. अमित जामसांदेकर, ॲड. वैशाली पाटील-जाधव व ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांचा समावेश आहे.