अपघातात चार ठार

By Admin | Updated: July 5, 2014 02:13 IST2014-07-05T02:13:34+5:302014-07-05T02:13:34+5:30

जिल्ह्यातील कळमेश्वर, कोराडी व खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ख्ुामारी, कोराडी व वारेगाव शिवारात...

Four killed in the accident | अपघातात चार ठार

अपघातात चार ठार

नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर, कोराडी व खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ख्ुामारी, कोराडी व वारेगाव शिवारात झालेल्या अपघातांच्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
भरधाव ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास खापरखेडा - कामठी रोडवरील वारेगाव कोराडी टी पॉर्इंट येथे घडली.
राजेंद्र तुफानीप्रसाद राजभर (२२, रा. चनकापूर, ता. सावनेर) व आकाश सुरेश चौधरी (१८, चनकापूर) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही एमएच-४०/आर-१८३७ क्रमांकाच्या मोटरसायकलने खापरखेडा येथून कामठीकडे जात होते. दरम्यान, वारेगाव टी पॉर्इंटजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-४०/एन-३७७९ क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. त्यात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तत्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आकाश हा मुंबई येथील एका कंपनीमध्ये काम करायचा. तो शुक्रवारी मुंबईला जाणार होता. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी ट्रकचालक रायभान निखाडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक केली. पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहे.
अपघाताची दुसरी घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहपा-खुमारी मार्गावरील मधुगंगा नदीच्या पुलावर गुरुवारी रात्री ९.२० वाजताच्या सुमारास घडली. यात अज्ञात भरधाव वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर, अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहपा - खुमारी येथे घडली. राजू परसराम लोणारे (३५, रा. खुमारी, ता. कळमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव असून, विठ्ठल दयणे (३७, रा. खुमारी, ता. कळमेश्वर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. राजू, विठ्ठल व शेषराव झाडे, रा. खुमारी, ता. कळमेश्वर हे तिघेही गुरुवारी रात्री मोहपा येथून एमएच-४०/जी-१००४ क्रमांकाच्या मोटरसायकलने खुमारी येथे जात होते. ते मोहपा-खुमारी मार्गावरील मधुगंगा पुलावर येताच विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात राजूचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, विठ्ठल गंभीर जखमी झाला. शेषरावला किरकोळ दुखापत झाली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमीला मोहपा येथील शासकीय रुग्णालयात हलविले. येथे त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अपघाताची तिसरी घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली. यात परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकच्या धडकेत एका ट्रकचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मृतीनगर रेल्वे ओव्हरब्रिजवर गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. मंजित संतोष सिंग (३५, रा. सिंगोपाल, बैताल, जिल्हा गुरुदासपूर, पंजाब) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. मंजित हा एचआर-५५/आय-१३३४ क्रमांकाचा ट्रक येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याच्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने मंजितचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच दुसरा ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी निशांत चंदन सिंग (५०, रा. सिंगोपाल, बैताल) याच्या तक्रारीवरून भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ)अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)

Web Title: Four killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.