मिहानमधील चार कर्मचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:31+5:302020-12-26T04:07:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भरधाव वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील पाचपैकी चौघांचा करुण अंत झाला. वर्धा मार्गावरील खापरी-मिहान ...

Four employees of Mihan were killed | मिहानमधील चार कर्मचारी ठार

मिहानमधील चार कर्मचारी ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भरधाव वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील पाचपैकी चौघांचा करुण अंत झाला. वर्धा मार्गावरील खापरी-मिहान पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये कारचालकासह दोन तरुणींचाही समावेश आहे. ते सर्वच्या सर्व मिहानमधील एक्झावेअर टेक्नॉलॉजी लिमिटेडचे कर्मचारी होते.

गुरुवारी डे-नाईट शिफ्ट आटोपल्यानंतर मध्यरात्री १ वाजता ते आपल्या घराकडे निघाले. मिहानमधील बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांना कंत्राट दिले आहे. अशाच एका वाहनातून (अर्टिका - एमएच ३१ - एटी २५९६) पीयूष टेकाडे (वय २५, रा. कोराडी रोड, नागपूर), नेहा गजभिये (वय २५, रा. वंजारी ले-आऊट, उप्पलवाडी, कामठी रोड), पायल कोचे (वय २७, रा. महेंद्रनगर, टेका), आशीष सरनायक (वय २७, रा. चक्रधरनगर, बोखारा) हे चार कर्मचारी आपल्या घराकडे निघाले. बालचंद्र उईके (वय ३४, रा. काचोरेनगर, चिंचभवन) हा वाहन चालवित होता. वाहनाची गती जास्त होती. अशात वेगात समोरून येणाऱ्या एका अवजड वाहनचालकाने अर्टिकाला जोरदार धडक मारली. ही धडक एवढी जबरदस्त होती की बऱ्याच दूरपर्यंत त्याचा आवाज आला. कारच्या समोरचा भाग पुरता चक्काचूर झाला होता. वाहनचालकासह पाचही जण कारमध्येच चेंदामेंदा झाल्यासारखी अडकून पडले.

दरम्यान, कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी वाहनेही तेथे थांबली. माहिती कळताच कंपन्यांचे अधिकारी, सोनेगाव पोलीस तसेच गस्तीवरील पोलिसांचा ताफाही धावला. कसे बसे सर्व जखमींना बाहेर काढून मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आशीष सरनायक वगळता सर्वांना मृत घोषित केले. सचिन बबन सुटे (वय ३९, रा. शताब्दी चौक) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला.

---

बळी घेणारा कोण?

या चाैघांचे बळी कोणत्या वाहनचालकाने घेतले, ते शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रक-टिप्पर चालकाने ही धडक दिल्याची चर्चा होती. मात्र, अद्याप तसे काहीही स्पष्ट झाले नाही. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोणत्या वाहनाने धडक दिली त्याचा आम्ही शोध घेत असल्याचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी लोकमतला सांगितले.

----

मिहानमध्ये शोककळा

या अपघातामुळे मिहान परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातापूर्वी हे सर्व कर्मचारी हसत खेळत आपल्या सहकाऱ्यांना निरोप देऊन वाहनात बसले. काही वेळेतच त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त कंपनीत पसरले अन् सर्वांना जोरदार धक्का बसला.

----

Web Title: Four employees of Mihan were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.