राष्ट्रीय ‘रँकिंग’मध्ये नागपूरच्या चार शिक्षण संस्था

By Admin | Updated: April 4, 2017 02:24 IST2017-04-04T02:24:48+5:302017-04-04T02:24:48+5:30

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले.

Four educational institutions of Nagpur in the National Ranking | राष्ट्रीय ‘रँकिंग’मध्ये नागपूरच्या चार शिक्षण संस्था

राष्ट्रीय ‘रँकिंग’मध्ये नागपूरच्या चार शिक्षण संस्था

‘व्हीएनआयटी’ देशात ४२ वे : नागपूर विद्यापीठाला ‘रँकिंग’च नाही
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात अभियांत्रिकी व फार्मसी क्षेत्रात नागपुरातील चार शैक्षणिक संस्थांचा पहिल्या शंभरात समावेश आहे. मात्र ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरैया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला पहिल्या ५० मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ४२ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’ १९ व्या स्थानावर होते. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नाही.
देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे ‘रँकिंग’ ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले होते. नागपूर विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचादेखील यात समावेश होता.
सोमवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’चा देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये ४२ वा क्रमांक आहे. अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये ‘आरकेएनईसी’ (रामदेवबाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज) व जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा क्रमांक अनुक्रमे ६४ व ६७ वा आहे. देशातील ‘टॉप’ फार्मसी महाविद्यालायंमध्ये नागपुरातील ‘गुरुनानक कॉलेज आॅफ फार्मसी’ला ४९ ‘रँकिंग’ मिळाले आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच या ‘रँकिंग’मधून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)

नागपूर विद्यापीठ शंभरात नाही
‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळविणाऱ्या नागपूर विद्यापीठाला मात्र ‘रॅकिंग’ मिळविण्यात यश आलेले नाही. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डी.वाय.पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ, सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, यांना या यादीत स्थान मिळाले आहे.

Web Title: Four educational institutions of Nagpur in the National Ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.