स्वाईन फ्लूने चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: March 24, 2015 02:18 IST2015-03-24T02:18:09+5:302015-03-24T02:18:09+5:30
स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या चार रुग्णांची नोंद सोमवारी उपसंचालक आरोग्य सेवा मंडळाने केली आहे.

स्वाईन फ्लूने चौघांचा मृत्यू
नागपूर : स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या चार रुग्णांची नोंद सोमवारी उपसंचालक आरोग्य सेवा मंडळाने केली आहे. यात तीन महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. नागपूर विभागात आतापर्यंत ९८ रुग्णांचा मृत्यू तर ५१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
उकाडा वाढला असतानाही स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसून येत आहेत. सोमवारी मेयोच्या प्रयोगशाळेत या आजाराचे २६ संशयित नमुने तपासण्यात आले. यातील ११ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यात मेयो व मेडिकल येथील चार-चार तर उर्वरित रुग्ण खासगी इस्पितळांतील आहेत. उपसंचालक आरोग्य सेवा मंडळाने सोमवारी नोंद केलेल्या तीन महिलांमध्ये २८ वर्षीय महिलेचा २० मार्च रोजी, ३० वर्षीय महिलेचा १७ मार्च रोजी, तर ३९ वर्षीय महिलेचा १६ मार्च रोजी मृत्यू झाला. ६० वर्षीय पुरुषाचा १६ मार्च रोजी मृत्यू झाला. सर्व मृत्यू मेयोमध्ये उपचारादरम्यान झाले आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ५३, नागपूर जिल्ह्यात ११, गोंदियात ३, चंद्रपूरमध्ये २, वर्धेत ६, भंडाऱ्यात १, गडचिरोली १, अकोला आरोग्य मंडळात ७, मध्य प्रदेशातील १२ व आंध्र प्रदेशातील २ असे एकूण ९८ रुग्णांचा बळी गेला आहे.(प्रतिनिधी)