नांद गणाकरिता चार उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST2021-07-07T04:09:49+5:302021-07-07T04:09:49+5:30
भिवापूूर : ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर जिल्ह्यात जि.प.च्या १६ तर पं.स.च्या ३१ गणासाठी निवडणूक होत ...

नांद गणाकरिता चार उमेदवारी अर्ज दाखल
भिवापूूर : ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर जिल्ह्यात जि.प.च्या १६ तर पं.स.च्या ३१ गणासाठी निवडणूक होत आहे. याअंतर्गत भिवापूर पंचायत समिती अंतर्गत नांद गणात सुद्धा निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी येथे चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सर्वसाधारण महिला करीता राखीव असलेल्या नांद गणाकरिता माधुरी संजय देशमुख (काँग्रेस), शोभा मोरेश्वर चुटे (भाजप), वनिता संतोष घरत (शिवसेना), सुनीता अशोक वाघ (वंचित) यांनी अर्ज दाखल केले. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पहायला मिळेल का, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र शिवसेनेने येथे स्वतंत्र उमेदवार दिल्याने येथे महाविकास आघाडीचा प्रयोग जुळला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने येथे उमेदवार दिलेला नाही. यासंदर्भात जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत यांच्याशी चर्चा केली असता पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढत असल्याचे सांगितले. उपजिल्हाधिकारी आशिष बिजवाल व तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले. गत सार्वत्रिक निवडणुकीत नांद गणात
काँग्रेस व भाजपचा धुवा उडवत काँग्रेसच्या बंडखोर नंदा नारनवरे या विजयी झाल्या होत्या. मात्र आता त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीत दुसऱ्यांदा लढण्यास नकार दर्शविला. काँग्रेसने येथे माधुरी देशमुख यांना रिंगणात उतरविले आहे. नंदा नारनवरे या तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य व दोन वेळा पंचायत समिती सदस्य राहिल्या आहेत.
गतवेळी काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवित इतर पक्षाच्या उमेदवारांना चारीमुंड्या चीत केले होते. यावेळी मात्र त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगत पोटनिवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे येथे इतर उमेदवारांना जिंकण्याची मोठी संधी मिळाली आहे. आ. राजू पारवे व माजी आ. सुधीर पारवे यांच्या गृह तालुक्यात ही निवडणूक होत असल्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात शिवसेना कोणते कौशल्य दाखविते हेही महत्त्वाचे ठरणार आहे.