हायकोर्ट : वर्धा जिल्ह्यातील हत्याप्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात ४ आरोपींना १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दिलीप सुरेश खराडे (२९), प्रशांत शिवाजी खराडे (२५), शिवाजी रामभाऊ खराडे (५३) व गुलाब गोविंदराव खराडे (६४) अशी आरोपींची नावे असून ते सर्व किन्हाळा (बोथली), ता. आर्वी येथील रहिवासी आहेत. वर्धा सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आजन्म कारावास व प्रत्येकी १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. आरोपींना कलम ३०२ ऐवजी ३०४-१ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरविले व आजन्म कारावासाची शिक्षा १० वर्षे सश्रम कारावासात परिवर्तित केली. सत्र न्यायालयाचा अन्य आदेश कायम ठेवला.मृताचे नाव बबनराव शिंदे होते. ३१ आॅगस्ट २००८ रोजी आरोपींनी बबनरावची हत्या केली. प्रशांतने तलवारीने वार केला, तर इतरांनी काठ्यांनी मारले. खरांगणा पोलिसांनी घटनेचा तपास केला होता. आरोपींतर्फे अॅड. एस. व्ही. सिरपूरकर व अॅड. राजेंद्र डागा, तर शासनातर्फे एपीपी विनोद ठाकरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
चार आरोपींना १० वर्षे कारावास
By admin | Updated: November 10, 2014 00:58 IST