सासू-सूनेच्या तक्रारीतून फुलले हास्याचे कारंजे
By Admin | Updated: June 29, 2014 00:45 IST2014-06-29T00:45:18+5:302014-06-29T00:45:18+5:30
सासू-सूनेचे नाते जगात प्रसिद्ध आहे. घराघरातील सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै-ला व्यासपीठावर आणल्यानंतर काय धम्माल उडते, याची प्रचिती मुंडले सभागृहात आली. एरवी सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै- ने घरातील

सासू-सूनेच्या तक्रारीतून फुलले हास्याचे कारंजे
सासू-सून जोडी नंबर वन : लोकमत सखी मंचचा उपक्रम
नागपूर : सासू-सूनेचे नाते जगात प्रसिद्ध आहे. घराघरातील सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै-ला व्यासपीठावर आणल्यानंतर काय धम्माल उडते, याची प्रचिती मुंडले सभागृहात आली. एरवी सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै- ने घरातील वातावरण गंभीर होते. मात्र येथे या तक्रारीतून विनोद निर्माण झाले. आणि सभागृहात हास्याचे कारंजे फुलले.
लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सासू-सून जोडी नंबर वन’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात लोकमत सखी मंचच्या सदस्यांपैकी १० कुटुंबातील सासू-सूनेने सहभाग घेतला होता. स्पर्धेत बिनधास्त बोल, परफेक्ट मॅचिंग, टॅलेंट राऊंड आणि प्रश्न उत्तरे अशा चार फेऱ्या होत्या. बिनधास्त बोल या फेरीपासून स्पर्धेला सुरुवात झाली. दहा सासू आणि त्यांच्या सूना मंचावर बसल्या होत्या. सुरुवातीला सासू आणि सूनांनी एकमेकांचे भरभरून कौतुक केले. तेव्हा दोघांचेही डोळे पाणावले. काही सासवांच्या डोळ्यांना आनंद आसवांची धारच लागली होती. मात्र जेव्हा निवेदिकेने त्यांचा चिमटा काढला, तेव्हा या दोघींनीही एकमेकींची गऱ्हाणी सांगण्यास कुठलीही कमतरता सोडली नाही. आपापल्या घरातील गऱ्हाणी जेव्हा सार्वजनिक होतात, तेव्हा कसा हंशा पिकतो, बघणारे कसा आनंद लुटतात, हे सासू-सून जोडी नंबर वनमध्ये उपस्थित रसिकांनी चांगलेच अनुभवले. सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै- चा उपस्थित रसिकांनी चांगलाच आनंद लुटला.
परफेक्ट मॅचिंग या फेरीत सासू आणि सूनेने आपापली आवड, स्वभाव यावर चर्चा केली. याफेरीसाठी स्पर्धेपूर्वी दोघींकडून एक फॉर्म भरून घेण्यात आला होता. या फॉर्म मध्ये लिहिलेल्या आवडीनिवडी आणि प्रत्यक्ष मंचावर सादर केलेल्या आवडीनिवडी यात किती तफावत आहे, हे परीक्षकांनी लक्षात घेतले. तृतीय फेरी ही प्रश्नोत्तराची होती. यात परीक्षकांनी काही प्रश्न दोघांनाही विचारले. यातूनही उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. चौथ्या फेरीत स्पर्धकांनी गायन, अभिनय आणि मिमिक्री सादर केली. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून प्रतिष्ठानच्या आरती शशिकांत बोदड, कल्पना भेंडे उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून मंदा गौर, रंजना दाते आणि डॉ. मानसी सहस्रबुद्धे यांनी काम पाहिले. संचालन सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले.
सासू-सुनेची विजयी जोडी
संपूर्ण फेऱ्यांचे परीक्षण झाल्यानंतर परीक्षकांनी पहिल्या तीन पुरस्काराची घोषणा केली. यात सासू आरती कावळे व सून तेजस्विनी कावळे ही जोडी नंबर वन राहिली. द्वितीय स्थान अनिता दारव्हेकर व परिणिता दारव्हेकर व तृतीय स्थान रमा फुके व डॉ. परिणिता फुके या जोडीने पटकाविले. परीक्षकांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.