पूर्व आरटीओ कार्यालयाला मिळणार स्वत:ची इमारत
By Admin | Updated: January 26, 2016 03:23 IST2016-01-26T03:23:07+5:302016-01-26T03:23:07+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला गेल्या पाच वर्षांपासून स्वत:ची इमारतच नव्हती. डिप्टी सिग्नल येथील

पूर्व आरटीओ कार्यालयाला मिळणार स्वत:ची इमारत
नागपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला गेल्या पाच वर्षांपासून स्वत:ची इमारतच नव्हती. डिप्टी सिग्नल येथील नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) सभागृहात भाडे तत्त्वावर कार्यालयाचा कारभार सुरू होता. याची दखल आ. कृष्णा खोपडे यांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला असता मंगळवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत बांधकामासाठी ३० कोटींच्या प्रस्तावास त्यांनी परवानगी दिली.
वाढते शहर, वाढती वाहने व वाढती गर्दी लक्षात घेऊन पूर्व नागपूरसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याला २४ आॅगस्ट २०११ ला मंजुरी देण्यात आली. पूर्व नागपूरकरांची ‘एम.एच. ४९’ अशी नवी ओळख निर्माण झाली. सुरुवातीपासून स्वतंत्र कार्यालयाच्या जागेसाठी प्रयत्न सुरू होते. परंतु जागेची समस्या मार्गी न लागल्यामुळे सुरुवातीला नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या तळमाळ्यावर हे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचा पदभार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्याकडे येताच त्यांनीही आपल्या परीने स्वतंत्र जागा मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात चिखली देवस्थान, डिप्टी सिग्नल येथील पाण्याच्या टाकीजवळील नासुप्रचे सभागृह भाडे तत्त्वावर मिळण्यास यश आले. गेल्या दीड वर्षांपासून येथे कार्यभार सुरू आहे. (प्रतिनिधी)
नासुप्र करणार बांधकाम
४आ. खोपडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, डिप्टी सिग्नल येथील चिखली ले-आऊट येथे नासुप्रची चार एकरची जागा पूर्व आरटीओला मिळण्यासाठी बऱ्याच प्रयत्नानंतर यश आले. चार कोटी एक लाख रुपये किमत असलेल्या या जागेचे आतापर्यंत परिवहन विभागाने २ कोटी ७० लाख भरले आहे. उर्वरित १ लाख ३१ लाख रुपये भरावयाचे होते, तसेच कार्यालयाच्या हायटेक बांधकामही प्रस्तावित होते. अखेर मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ३० कोटींच्या प्रस्ताव्यास मान्यता दिली. बांधकामाची जबाबदार नासुप्रकडे देण्यात आली आहे.
तीन मजली असणार इमारत
४खोपडे म्हणाले, पूर्व आरटीओ कार्यालयाची ही इमारत तीन मजली असणार आहे. यासाठी २८.३८ कोटी इतका निधी नियोजित केला आहे. तळमजल्यावर प्रतीक्षा हॉल, परमिट, ट्रान्सपोर्ट, नॉन ट्रान्सपोर्ट, परवाना आदी विभाग असणार आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रेकॉर्ड विभाग, कॉन्फरन्स हाल व आवश्यक कार्यालय असेल. पारदर्शक कामकाज ही या कार्यालयाची ओळख राहिली आहे.