माजी महापौर कल्पना पांडे एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: October 15, 2015 03:12 IST2015-10-15T03:12:56+5:302015-10-15T03:12:56+5:30
एका निवृत्त शिक्षिकेच्या निवृत्तीवेतन आवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी माजी महापौर,...
_ns.jpg)
माजी महापौर कल्पना पांडे एसीबीच्या जाळ्यात
निवृत्त शिक्षिकेला मागितली लाच बहिणीलाही अटक न्यायालयातून जामीन
नागपूर : एका निवृत्त शिक्षिकेच्या निवृत्तीवेतन आवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी माजी महापौर, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या डॉ. कल्पना प्रवीण पांडे आणि त्यांच्या भगिनी भारती सुधीर पांडे बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. या दोघींनाही नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी अनुक्रमे सकाळी ७.३० आणि ८.३० वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. कल्पना पांडे या गांधीबाग येथील छन्नूलाल नवीन विद्याभवन टीचर्स एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या तर भारती पांडे या छन्नूलाल नवीन विद्याभवन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत.
‘तो’ सापळाच ठरला अयशस्वी
नागपूर : या प्रकरणातील तक्रारकर्त्या सपना जयसिंघानी ह्या खामला भागात राहतात. त्या ३१ जुलै २०१५ रोजी छन्नूलाल नवीन विद्याभवन हायस्कूलमधून सेवानिवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन संबंधातील कागदपत्रांवर मुख्याध्यापिका भारती पांडे याच्या स्वाक्षरीची आवश्यकता होती. जयसिंघानी यांनी पांडे यांची भेट घेतली असता त्यांनी पेन्शन फॉर्मवर स्वाक्षरी करण्यासाठी ५० हजाराची मागणी केली. ९ सप्टेंबर २०१५ रोजी निवृत्त शिक्षिका ही पेन्शन संबंधाने शाळेत गेल्या असता भारती पांडे यांनी शाळा व्यवस्थापनातील सदस्या आपली बहीण कल्पना पांडे यांना बोलावून घेतले होते. ५० हजार रुपये दिले नाही तर १० वर्षे पेन्शन होऊ देणार नाही, अशी धमकीही पांडे यांनी त्यांना दिली होती. त्यांनी या निवृत्त शिक्षिकेला १० सप्टेंबर रोजीच पैसे घेऊन बोलावले होते. परंतु जयसिंघानी यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. रीतसर सापळाही रचण्यात आला होता. पंचासमक्ष लाच संबंधातील दोन्ही आरोपी आणि तक्रारकर्तीमधील संभाषण ध्वनिमुद्रित करण्यात आले होते. ७, ८ आणि १३ आॅक्टोबर रोजी सापळे रचण्यात आले होते. परंतु कल्पना पांडे जयसिंघानी यांना टाळत असल्याने सापळ्याची कार्यवाही स्थगित ठेवण्यात आली होती. ध्वनिमुद्रित संभाषणावरून या दोघींविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजीव जैन आणि त्यांच्या वेगवेगळ्या पथकांनी गांधीबाग येथील शाळा परिसरात, कल्पना पांडे यांच्या मेडिकल चौकातील रूपम अपार्टमेंट येथील निवासस्थानी तसेच भारती पांडे यांच्या भगवाननगरनजीकच्या श्यामनगर येथील निवासस्थानी धाडी घातल्या व दोघींनाही अटक केली. (प्रतिनिधी)
सर्व आरोप निराधार, चौकशीला तयार
लाचलुचपत खात्याने केलेल्या कारवाईनंतर बुधवारी सायंकाळी माजी महापौर कल्पना पांडे यांनी स्वत:वरील सर्व आरोप निराधार असून कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचा दावा केला आहे. एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला आहे. सपना जयसिंघानी या जुलैमध्ये निवृत्त झाल्या असल्या तरी त्यांच्या निवृत्तीवेतनाची ‘केस’ जानेवारी महिन्यातच पाठविण्यात आली होती. त्यावेळेस त्यांच्याकडून एकाही पैशाची मागणी करण्यात आली नाही. निवृत्त झाल्यानंतर ‘ग्रॅच्युईटी’चे सर्व पैसे त्यांना मिळाले आहेत. जयसिंघानी या दुसऱ्या शाळेत अतिरिक्त ठरल्यामुळे छन्नूलाल नवीन विद्या भवन येथे रुजू झाल्या होत्या. त्यांना शाळेत घेण्यास माझा विरोध होता. तेव्हाच त्यांनी पाहून घेण्याची धमकी दिली होती व त्यातूनच हा प्रकार त्यांनी केला असल्याचा आरोप कल्पना पांडे यांनी लावला.
क्रीडा साहित्य घोटाळ्यातही आरोपी
कल्पना पांडे या १९९९ मध्ये नागपूर शहराच्या दुसऱ्या महिला महापौर होत्या. त्यानंतर २००२ मध्ये कोट्यवधीच्या क्रीडा साहित्य घोटाळ्याने उचल खाल्ली होती. ही भाजपचीच कारकीर्द होती. मनपा अधिकारी साहेबराव राऊत यांच्यासह बरेच नगरसेवक व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. कल्पना पांडे या घोटाळ्यातील आरोपी होत्या. त्यांना पाच दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड झाला होता.