अभियंत्याच्या भूमाफिया ग्वालबंशीसह माजी नगरसेवक माटे गजाआड
By Admin | Updated: April 21, 2017 19:54 IST2017-04-21T19:54:31+5:302017-04-21T19:54:31+5:30
भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि माजी नगरसेवक राजेश माटे या दोघांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने कोट्यवधींची जमीन हडपल्याने

अभियंत्याच्या भूमाफिया ग्वालबंशीसह माजी नगरसेवक माटे गजाआड
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21 - शहरातील भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि माजी नगरसेवक राजेश माटे या दोघांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने कोट्यवधींची जमीन हडपल्याने त्रस्त झालेल्या एका जमीन मालकाने गळफास लावून आत्महत्या केली. भूपेश चंद्रकांत सोनटक्के (वय ४२) असे मृत जमीन मालकाचे नाव असून, ते सिव्हील इंजिनियर होते. तब्बल सहा महिन्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर बुधवारी रात्री मानकापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची २४ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी मिळवली. या प्रकरणामुळे उपराजधानीतील भूमाफियांचा काळा चेहरा पुन्हा एकदा उजेडात आला आहे.
भूपेश यांनी २००२ मध्ये गोरेवाडा परिसरात ५ एकर जमीन खरेदी केली होती. काही वर्षानंतर भूपेश यांच्यासोबत भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याने जमिनीचा सौदा केला. मात्र, रक्कम देण्यास टाळाटाळ केली. दरम्यानच्या कालावधीत या भागातील जमिनीला सोन्याची किंमत आली. त्याचवेळी ओळखीचा असलेला माजी नगरसेवक राजेश माटे याने भूपेशच्यावतीने आधी ग्वालबन्सीसोबत समेटाचे प्रयत्न केले. नंतर मात्र माटे आणि ग्वालबन्सी हे दोघेही भूपेशवर जमिनीची विक्री करून देण्यासाठी दबाव टाकू लागले. याच कालावधीत त्यांनी १२ लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन भूपेशकडून लेखी करारनामा करून त्याआधारे बनावट कागदपत्रे तयार करून भूपेशची फसवणूक केली. नंतर मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले. इकडे कर्जाचा डोंगर झाल्याने कर्जदाराचा भूपेशमागे तगादा सुरू झाला. आरोपी मात्र रक्कम देण्याऐवजी शिव्या, धमक्या देऊ लागले. दोन्हीकडून कोंडी झाल्याने अखेर भूपेशने २९ आॅक्टोबर २०१६ ला मानकापूरच्या अण्णानगर, एमबी टाऊन समोरच्या जिममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, मृत्यूपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात आरोपींच्या नावाचाही उल्लेख केला. भूपेशची बहीण स्वाती सोनटक्के (वय ३९) यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रार केली. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली. त्यात आरोपींनी भूपेशला १० लाख, ५० हजार रुपये देण्यास टाळाटाळ करून मानसिक त्रास दिल्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. याप्मुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची २४ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी मिळवली.
अनेकांच्या जमिनी हडपल्या
आरोपी ग्वालबन्सी आणि त्याचे साथीदार जमीन हडपण्यासाठी कुख्यात आहे. त्यांनी अनेक गोरगरीब शेतकरी, जमीन धारकांच्या जमिनी हडपल्या आहेत. जमिनी हडपल्यानंतर संबंधितांना मारहाण करणे, धमकी देऊन बनावट कागदपत्रांवर सह्या घेऊन जमिनीची परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपये गिळंकृत करणे, अशीच या भूमाफियाची कार्यपद्धत असून त्याच्याविरुद्ध गिट्टीखदान, सदरसह अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांची साथ असल्यामुळे आरोपीं निर्ढावले आहेत. या निर्ढावलेपणातूनच ग्वालबन्सीने उद्योगपती डागा यांची जमीन हडपण्याचेही काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले होते. लोकमतने हे प्रकरण लावून धरल्यामुळेच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. भूपेशच्या संशयास्पद मृत्यूबाबतही लोकमतने आवाज उठविला होता. दरम्यान, या प्रकरणामुळे पोलिसांनी भूमाफिया ग्वालबन्सी आणि त्याच्या साथीदारांची कुंडली बाहेर काढली असून, त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तयारी चालविल्याची माहिती आहे.