पतसंस्थेच्या माजी कॅशिअरकडून पावत्यांवर बनावट सह्या, ग्राहकांची फसवणूक
By योगेश पांडे | Updated: December 21, 2023 17:59 IST2023-12-21T17:58:45+5:302023-12-21T17:59:13+5:30
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

पतसंस्थेच्या माजी कॅशिअरकडून पावत्यांवर बनावट सह्या, ग्राहकांची फसवणूक
नागपूर : शहरातील एका पतसंस्थेच्या माजी कॅशिअरने केलेला घोटाळा समोर आला आहे. संबंधित कॅशिअरने २३ पावत्यांवर बनावट सह्या करून ग्राहकांचे पैसे काढून फसवणूक केली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
मनिष दत्तात्रय कल्याणकर (महादुला, कोराडी) असे आरोपीचे नाव आहे. तो विवेकानंद नागरिक पतसंस्थेत २०११ सालापासून कॅशिअर म्हणून कार्यरत होता. २०१७ साली हुडकेश्वर येथे पतसंस्थेची शाखा उघडली व कल्याणकरला तिकडे पाठविण्यात आले. २०१९ पर्यंत त्याने ग्राहकांच्या फिक्स डिपाॅझीट प्रमाणपत्र पावत्यांपैकी, एकुण २३ पावत्यांवर बनावट सह्या केल्या. त्यानंतर ग्राहकांच्या खोट्या सह्या करून एका ग्राहकाचे १.०८ लाख रुपये परस्पर काढण्याची बाब समोर आली.
ग्राहकांचे एकुण 1,08,419/-रू. काढुन स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता घेवुन संस्थेची व ग्राहकांची फसवणुक केली. २०१९ साली त्याने नोकरीचा राजिनामा दिला. काही दिवसांअगोदर एक महिला ग्राहक एफडी प्रमाणपत्र घेऊन आला असता या प्रकाराचा खुलासा झाला. इतरही ग्राहकांची अशी फसवणूक केल्याची शक्यता आहे. दरम्यान, शाखेचे व्यवस्थापक आशुतोष देव यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कल्याणकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.