एक रुपया भाड्यानेच मिळणार जंगल

By Admin | Updated: August 7, 2014 01:00 IST2014-08-07T01:00:18+5:302014-08-07T01:00:18+5:30

जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून केवळ २ किलोमीटरवर असलेले व वृक्षारोपणामुळे तयार झालेले घनदाट जंगल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला केवळ एक रुपया भाड्यानेच मिळणार आहे.

The forest will get only one rupee | एक रुपया भाड्यानेच मिळणार जंगल

एक रुपया भाड्यानेच मिळणार जंगल

हायकोर्टात माहिती : लोणार सरोवर परिसरातील वृक्षसंवर्धन
नागपूर : जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून केवळ २ किलोमीटरवर असलेले व वृक्षारोपणामुळे तयार झालेले घनदाट जंगल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला केवळ एक रुपया भाड्यानेच मिळणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही माहिती दिली.
महामंडळाला हे जंगल देखभालीसाठी देण्यात येणार आहे. सुरुवातीला शासनाने जंगल देण्यासाठी बाजारभावाच्या ८ टक्के रक्कम मागितली होती, तर महामंडळ एक रुपया भाड्यावर जंगल घेण्यास अडून होते. शेवटी शासनाने नमती भूमिका घेतली. महामंडळाला १० वर्षांसाठी जंगल हस्तांतरित करण्यात येणार आहे. सर्व अधिकार बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ते सुरुवातीला केवळ २ वर्षांसाठी जंगल देतील. यानंतर उर्वरित ८ वर्षांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
जंगलाचे हस्तांतरण एका आठवड्यात होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने राज्याच्या वन विभागाचे सचिव, पर्यटन विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अमरावती विभागीय आयुक्त व बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन भाड्याच्या तिढ्यावर तोडगा काढण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले होते. लोणार सरोवर जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळासारखे विकसित करावे यासाठी अ‍ॅड. कीर्ती निपाणकर व अन्य दोघांनी जनहित याचिका दाखल केली आहे़ त्यात पुंडलिक मापारी यांनी दिवाणी अर्ज केला आहे. महामंडळाला सोपविण्यात येणाऱ्या जंगलाच्या जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आले आहे. जंगलात विविध प्रजातीचे पशुपक्षी आहेत. परंतु, झाडांच्या अवैध कत्तलीमुळे जंगल नष्ट होत आहे. येथील वृक्षांचे संरक्षण व देखभाल करावी, अशी मापारी यांची विनंती होती.(प्रतिनिधी)

Web Title: The forest will get only one rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.