वन अधिकारी एसीबीच्या पिंजऱ्यात
By Admin | Updated: March 16, 2017 02:05 IST2017-03-16T02:05:40+5:302017-03-16T02:05:40+5:30
वन विभागातील रपटा बांधकामाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी तीन लाख रुपयाची मागणी करणारा काटोल वन विभागाचा विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी

वन अधिकारी एसीबीच्या पिंजऱ्यात
३.२० लाखाची लाच घेताना पकडले : वन विभागात खळबळ
नागपूर : वन विभागातील रपटा बांधकामाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी तीन लाख रुपयाची मागणी करणारा काटोल वन विभागाचा विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काशीराम माकडे रा. गाडगेबाबानगर वानाडोंगरी आणि मोजमाप पुस्तिकेसाठी २० हजार रुपयाची मागणी करणारा वन विभाग नागपूर सर्कलचा शाखा अभियंता अनिल पडोळे रा. गोरेवाडा याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाच्या झिरो माईल स्थित कार्यालयात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे कंत्राटदार असून सन २०१६ मध्ये काटोल परिक्षेत्र नागपूर वन विभागातील रपटा बांधकामाचे सब कॉन्ट्रॅक्ट रीतसर कार्यवाही करून मिळविले होते. सदर बांधकामाकरिता त्यांनी चार कामे पूर्ण करून केली होती.
या कामांचे बिल ११.४६ लाख रुपये इतके झाले होते. ते बिल मिळविण्यासाठी कंत्राटदार हे काटोल वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (विभागीय) अशोक काशीराम माकडे यांना भेटले. त्यांनी बिल काढून देण्यासाठी तीन लाख रुपयाची लाच मागितली. तसेच त्याच कामाची मोजमाप पुस्तिका बिल काढण्यासाठी नागपूर सर्कलचे शाखा अभियंता अनिल पडोळे यांनी २० हजार रुपयाची मागणी केली. दोन्ही लोकसेवकाने लाचेची मागणी केली परंतु कंत्राटदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरुवातीला दोन्ही लोकसेवकांची पडताळणी केली. त्यानंतर त्यांनी लाच मागितल्याचे लक्षात येताच विभागाने त्यांना रंगेहात पकडण्याची योजना आखली.
माकडे हा काटोल येथे कार्यरत आहे. त्याने बुधवारी कंत्राटदाराला पैसे घेऊन धरमपेठ येथील एका रेस्टॉरेंटमध्ये बोलाविले.
ठरलेल्या योजनेनुसार कंत्राटदार एसीबीच्या चमूसह सकाळी १० वाजता रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. तिथे एसीबीने त्याला ३ लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. यानंतर कंत्राटदाराने पडोळेशी संपर्क साधला. त्याने पैसे घेऊन झिरो माईल येथील वन विभागाच्या कार्यालयात येण्यास सांगितले. तिथे पैसे स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, पोलीस हवालदार भानुदास गीते, लक्ष्मण परतेकी, रेखा यादव, शिशुपाल वानखेडे, मनोज केदार आदींनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)