वन विभागाने पकडले २१ पोपट

By Admin | Updated: July 15, 2016 03:00 IST2016-07-15T03:00:40+5:302016-07-15T03:00:40+5:30

वन विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने गुरुवारी दुपारी एका अज्ञात आरोपींकडून २२ पोपट जप्त केले.

Forest Department captured 21 parrots | वन विभागाने पकडले २१ पोपट

वन विभागाने पकडले २१ पोपट

आरोपी फरार : गोरेवाडा जंगलात सोडले
नागपूर : वन विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने गुरुवारी दुपारी एका अज्ञात आरोपींकडून २२ पोपट जप्त केले. काटोल रोडवरील अंजुमन स्कूल बस स्टॅँडशेजारी ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, वन्यजीव कायद्यानुसार पोपटांची खरेदी-विक्री करण्यावर बंदी आहे. मात्र असे असताना शहरातील अनेक ठिकाणी पोपटांचा बाजार भरतो. नागपूर वन विभागाने दोन वर्षांपूर्वी या पोपटांच्या खरेदी-विक्री विरुद्ध विशेष मोहीम राबविली होती. त्यात शेकडो पोपटांसह अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शहरातील हा पोपटांचा बाजार काही दिवसांसाठी बंद झाला होता. परंतु मागील वर्षीपासून पुन्हा मोठ्या प्रमाणात पोपटांची खरेदी विक्री सुरू झाली आहे. त्यानुसार गुरुवारी काटोल रोडवर एक अज्ञात आरोपी पोपटांची विक्री करीत होता. त्याचवेळी तेथून जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची त्या व्यक्तीवर नजर पडली. पोलिसांनी त्या व्यक्तीकडे धाव घेताच आरोपीने पोपट तेथेच सोडून पळ काढला. यानंतर पोलिसांनी लगेच वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील बचाव पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी डवरे यांना माहिती दिली. डवरे यांनी वनपाल गेडाम यांच्या नेतृत्वात एक पथक घटनास्थळी पाठविले.
त्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ते सर्व पोपट ताब्यात घेतले. शिवाय सायं. ४.३० वाजताच्या सुमारास त्यापैकी २१ पोपटांना गोरेवाडा जंगलात सोडण्यात आले. तसेच उडू न शकलेल्या एका पोपटाला सेमिनरी हिल्स येथील ट्रॉन्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणून त्याच्यावर उपचार केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Forest Department captured 21 parrots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.