जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: October 8, 2015 02:32 IST2015-10-08T02:32:57+5:302015-10-08T02:32:57+5:30
मना विरुद्ध लग्न लावून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे घरून पलायन केलेल्या युवतीला रेल्वे सुरक्षा दलाने लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न
युवतीचे पलायन : आरपीएफने केले लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन
नागपूर : मना विरुद्ध लग्न लावून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे घरून पलायन केलेल्या युवतीला रेल्वे सुरक्षा दलाने लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. लोहमार्ग पोलिसांनी या युवतीला महिला सुधारगृहात पाठविले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या रितू देवास या महिला आरक्षकास ६ आॅक्टोबरला रात्री १०.३० वाजता गस्त घालीत असताना प्लॅटफार्म क्रमांक १ वर एक युवती संशयास्पदरीत्या आढळली. तिने या युवतीची चौकशी केली असता तिने घरून पळून आल्याचे सांगितले.
तिला रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणण्यात आले. तेथे विचारपूस केल्यानंतर या युवतीने आपण गोभन चौहारा ता. खैर जि. अलिगड, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून वडील आपल्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे घरी कुणालाच न सांगता ही युवती दिल्लीला गेली.
तेथून गोंडवाना एक्स्प्रेसने नागपुरात आली. रेल्वे सुरक्षा दलाने या युवतीस लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. लोहमार्ग पोलिसांनी या युवतीस महिला सुधारगृहात पाठविले आहे. (प्रतिनिधी)