‘दहाच्या आत’ची सक्ती
By Admin | Updated: June 4, 2016 02:55 IST2016-06-04T02:55:49+5:302016-06-04T02:55:49+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थिनींच्या दहा वाहनांना गुरुवारी पहाटे पेटवून दिल्याने खळबळ उडाली.

‘दहाच्या आत’ची सक्ती
मुलींच्या वसतिगृहात लागले सीसीटीव्ही : वाहन पेटवल्याची करणार चौकशी
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थिनींच्या दहा वाहनांना गुरुवारी पहाटे पेटवून दिल्याने खळबळ उडाली. वसतिगृह क्रमांक दोनमध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण मेडिकल हादरले आहे. या प्रकरणाची चौकशी अजनी पोलीस करीत असले तरी यातील गांभीर्य लक्षात घेऊन मेडिकल प्रशासनानेही आपल्या स्तरावर चौकशी सुरू केली आहे. सोबतच रात्री १० वाजतानंतर वसतिगृहातील सर्व प्रवेशद्वार बंद करण्याच्या नियमांचे सक्तीने पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
अधिष्ठाता कार्यालयाच्या अगदी जवळ हे मुलींचे वसतिगृह आहे. वसतिगृहाचे प्रवेशद्वार बंद असताना आत उभ्या केलेल्या दुचाकींना पहाटे २.३० वाजताच्या सुमारास आग लावण्यात आली. या आगीत ५० वर दुचाकी जळाल्या असत्या परंतु मुलींनी तत्काळ इतर दुचाकी हटविल्याने आग आटोक्यात राहिली. या घटनेला मेडिकल प्रशासनाने सुरुवातीला गंभीरतेने घेतले नव्हते, परंतु चर्चा वाढताच शुक्रवारी चौकशीला सुरुवात केली. विशेष म्हणजे, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन्ही मुलींच्या वसतिगृहात २४ तासांच्या आत सीसीटीव्ही बसविले. तसेच तेथील सामान्य सुरक्षा रक्षक काढून त्या जागी निवृत्त सैनिकांच्या सुरक्षा रक्षकांची कंपनी असलेल्या मॅस्कोचे रक्षक तैनात केले. या सोबतच रात्री १० वाजतानंतर प्रवेशद्वार बंद करण्याच्या सूचनाही सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या. यामुळे रात्री उशिरापर्यंत वसतिगृहाच्या बाहेर राहणाऱ्यांवर याचा वचक बसणार आहे. शनिवारपासून संरक्षण भिंतीच्या डागडुजीला सुरुवात होत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी दिली. शुक्रवारी अजनी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करीत दुचाकी जळालेल्या विद्यार्थिनींची चौकशी केल्याचे समजते. (प्रतिनिधी)