फुटबॉल ग्राऊंड बनले दारुड्यांचा अड्डा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:52+5:302021-07-28T04:07:52+5:30
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : कचरा संकलनामुळे दुर्गंधी : कंत्राटदाराने केबल बंडल ठेवण्यासाठी बनविले गोदाम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

फुटबॉल ग्राऊंड बनले दारुड्यांचा अड्डा ()
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : कचरा संकलनामुळे दुर्गंधी : कंत्राटदाराने केबल बंडल ठेवण्यासाठी बनविले गोदाम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शंकर नगर भागातील फुटबॉल ग्राऊंडला कंत्राटदाराने केबल बंडल ठेवण्याचे गोदाम बनविले आहे. त्यात अवैध पार्किंग, करण्यात आलेले जागोजागी खोदकाम यामुळे मुलांना खेळता येत नाही. दुसरीकडे रात्रीच्या अंधारात परिसरातील दारुडे मैदानात दारू पिऊन धुडगूस घालत असल्याने परिसरातील नागरिकांत दहशत पसरली आहे.
कंत्राटदाराने अंडर ग्राऊंड केबल टाकण्यासाठी जागोजागी खोदकाम केले आहे. खोदकामाचा मलबा अजूनही तसाच पडून आहे. मनपा प्रशासनाची परवानगी न घेता केबलचे बंडल मैदानात ठेवण्यात आले आहे. मैदानाच्या एका बाजूला कचरा संकलन केंद्र बनविण्यात आले आहे. सफाई कर्मचारी परिसरातून संकलित केलेला कचरा येथे जमा करतात. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांत असंतोष आहे.
तीन महिन्यांपूर्वी वादळामुळे मैदानात झाडे पडले होते. ते अजूनही तसेच पडून आहे. मनपाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते हटविलेले नाही. ते त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
....
व्यावसायिकांची अवैध पार्किंग
ट्रान्सपोर्ट व्यवसायिक, लॉन संचालकांनी मैदानालाच पार्किंग बनविले आहे. येथे वाहने उभी ठेवली जातात. वाहने उभी करण्यावरून परिसरातील नागरिकांशी वाद करतात. या संदर्भात तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.
....
सांस्कृतिक भवनावर कब्जा
मैदानातील सांस्कृतिक भवनावर अवैध कब्जा केला आहे. येथील क्रीडा साहित्याची देखभाल करण्यासाठी मनपा प्रशासनाने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याची गरज आहे. सांस्कृतिक भवनावरील कब्जा हटविण्यात यावा. सार्वजिनक कार्यासाठी त्याचा वापर करता यावा. अशी नागरिकांची मागणी आहे.
....
मनपा आयुक्तांकडे तक्रार
शंकर नगर परिसरातील त्रस्त नागरिकांनी मंगळवारी अॅड. अक्षय समर्थ यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना फुटबॉल ग्राऊंडच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिले. येथील कचरा संकलन केंद्र हटविण्यात यावे. मैदानात ठेवण्यात आलेले केबल बंडल हटविण्यात यावे. परिसरात दिवे लावण्यात यावे, खोदकामाची माती हटविण्यात यावी. रात्रीच्या सुमारास दारुडे दारू पितात याला आळा घालण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. अवैध पार्किंगला आळा घालावा, अशी मागणी केली.