सदर उड्डाणपुलाचे वळण बनलेय ‘ब्लॅक स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:24+5:302020-12-26T04:07:24+5:30
- ‘शॉर्टकट’च्या घाईने अपघाताची शक्यता - लोकमत ऑन दी स्पॉट सैयद मोबीन / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सदर ...

सदर उड्डाणपुलाचे वळण बनलेय ‘ब्लॅक स्पॉट’
- ‘शॉर्टकट’च्या घाईने अपघाताची शक्यता
- लोकमत ऑन दी स्पॉट
सैयद मोबीन / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर उड्डाणपुलाच्या जुन्या काटोल नाका चौकाकडे उतारावरील मॉईल गेटजवळील वळण ‘ब्लॅक स्पॉट’ बनले आहे. शॉर्टकटच्या घाईगडबडीत येथे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘लोकमत’च्या टीमने शुक्रवारी दुपारी घटनास्थळावर पोहोचून जवळपास एक तास नजर ठेवली. तेव्हा स्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले. वेळीच ही बाब प्रशासनाच्या नजरेस आली नाही आणि योग्य ती पावले उचलली गेली नाही तर भविष्यात भयंकर घटनेत एखाद्याचा जीव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
* दलाल कम्पाऊंडजवळ बंद तर येथे का नाही
जुन्या काटोल चौकाच्या उतारावर दलाल कम्पाऊंडजवळ आणि मॉईल गेटजवळ दोन वळणे होती. यातील दलाल कम्पाऊंडजवळचे वळण ट्रॅफिक पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले. परंतु, मॉईलच्या गेटजवळील वळण सुरू ठेवण्यात आले आहे. याचा लाभ घेत वाहनचालक तेथूनच गाड्या घुसवू लागले आहेत. या वळणावरून यू-टर्न घेण्याचे कोणतेच कारण नाही. परंतु, उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनचालकांसोबतच उड्डाणपुलाच्या खालून येणारे वाहनचालकही येथूनच उलट्या दिशेने वाहने काढत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावते आहे.
* दोन्हींकडून येतात वेगवान वाहने
मॉईल गेटजवळ असलेल्या वळणावर दोन्ही बाजूंनी वेगवान वाहनांची रेलचेल असते. उड्डाणपुलावरून उतरणारी वाहने उतारामुळे गतिशील असतात तर जुन्या काटोल चौकाकडून येणारी वाहनेही इथपर्यंत येताना वेग धरत असतात. अशा स्थितीत उलट्या दिशेने वाहन टाकून वळणाचा वापर करणे वाहनचालकांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे, या ‘ब्लॅक स्पॉट’वर तात्काळ पर्याय शोधणे गरजेचे आहे.
* लवकरच उचलली जातील योग्य पावले
अपघाताच्या शक्यतेमुळे दलाल कम्पाऊंडजवळील वळण बॅरिकेड्स बंद करण्यात आले आहे. मॉईल गेटजवळील वळणाचे योग्य आकलन करण्यात येऊन, योग्य कार्यवाही केली जाईल आणि संबंधितांना निर्देश दिले जातील. गरज पडल्यास हे वळणही बॅरिकेड्सने बंद केले जाईल.
- सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (रहदारी)
.......