पुरामुळे पूर्व विदर्भात महावितरणला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:40 IST2020-09-03T20:38:20+5:302020-09-03T20:40:11+5:30

पूर्व विदर्भात मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ९ कोटी २३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Floods hit MSEDCL in East Vidarbha | पुरामुळे पूर्व विदर्भात महावितरणला फटका

पुरामुळे पूर्व विदर्भात महावितरणला फटका

ठळक मुद्दे नागपूर, भंडारा, गडचिरोली मंडळात सर्वाधिक नुकसान९.२३ कोटीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व विदर्भात मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ९ कोटी २३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज यंत्रणा दुरुस्त केल्याने प्रभावित झालेल्या सुमारे १ लाख ३८ हजार ग्राहकांपैकी १ लाख २३ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात आला आहे. वीज यंत्रणेची सर्वाधिक हानी भंडारा, नागपूर आणि गडचिरोली म्मंडळ अंतर्गत झाली आहे.

विदर्भातील नागपूर ग्रामीण, भंडारा, ब्रह्मपुरी आणि गडचिरोली या भागात २९ ऑगस्टला आलेल्या पुरामुळे वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरणचे सर्वाधिक ३ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान भंडारा मंडळात झाले असून गडचिरोली मंडळात महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ३ कोटी २७ लाख रुपयांचे नुकसान झाले तर नागपूर ग्रामीण मंडळामध्ये नुकसानीचा आकडा २ कोटी ६८ लाख एवढा आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणच्या मालमत्तेचे १५ लाखाचे तर अमरावती परिमंडळात ३ लाख ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात बाधित रोहित्रांची संख्या ४ हजार ३३४ आहे. संपूर्ण विदर्भात पुरामुळे ६२५ गावे बाधित झाले होती. वीजपुरवठा प्रभावित झालेल्या ग्राहकांची सर्वाधिक संख्या गडचिरोली मंडळात असून तेथे सुमारे ८९ हजार ग्राहक प्रभावित झाले होते. भंडारा मंडलात २८ हजार तर नागपूर ग्रामीण मंडळात २० हजार ग्राहक प्रभावित झाले होते.

१५ हजार ग्राहक अजूनही अंधारात
पुराचे पाणी कायम असलेल्या नागपूर ग्रामीण मंडळ तसेच गडचिरोली मंडळ अंतर्गत दुर्गम भागात असलेल्या सुमारे १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात महावितरणला अडचणी येत आहेत. त्यामुळे येथील नागरिक अजूनही अंधारात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागांचा दौरा केला असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

 

Web Title: Floods hit MSEDCL in East Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.