लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरकरांसाठी नववर्ष सुरू होण्याआधीच एक मोठी खुशखबर आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार ५ डिसेंबरला सत्तेवर येत आहे. त्यापूर्वीच नागपूर शहराच्या विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत. वर्कऑर्डरही काढण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने नवीन उड्डाणपुलांचा यात समावेश असेल, या विकासकामांच्या झपाट्याने 'स्मार्ट नागपूर'च्या विकासाला वेग येणार आहे. नवीन साकारण्यात येणारे उड्डाणपूल अत्याधुनिक दर्जाची असणार आहेत.
उड्डाणपुलांच्या निर्मितीमुळे वाहतूक समस्येवर तोडगा
- नागपुरात रॅडिसन ब्ल्यू ते मनीषनगर आणि मानेवाडा चौक ते म्हाळगीनगर चौकापर्यंत आणखी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. शहरातील उड्डाणपुलाचे जाळे मजबूत करून वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
- या अनुषंगाने मनीषनगर ते हॉटेल रेडिसन ब्ल्यू असा नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासोबतच म्हाळगीनगर आणि मानेवाडा चौकापर्यंतच्या नवीन उड्डाणपुलांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बैंक विभागाने या पुलांसाठी निविदा काढल्या आहेत.
- या उड्डाणपुलांचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांनी सांगितले. जागतिक बँकेच्या आर्थिक साहाय्याने १४२.५५ कोटी रुपये, एक हजार रुपये खर्चुन साकारण्यात येणाऱ्या वा उड्डाणपुलांमुळे वाहतुकीच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे. यापूर्वी म्हाळगीनगर आणि मानेवाडा चौकात उड्डाणपूल प्रस्तावित होते.
- आता यात दुरुस्ती करून म्हाळगीनगर ते मानेवाडा चौक असा एकच उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे काम सीएस कन्स्ट्रक्शन आणि केसीसी यांना देण्यात आले आहे. या नवीन पुलाच्या माध्यमातून शताब्दी चौक हा दिघोरी चौक उड्डाणपुलाला जोडला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण नागपुरातील वाहतूक व्यवस्था सुधारल्याचा दावा केला जात आहे.
मनीषनगर उड्डाणपुलाच्या डिझाइनमध्ये सुधारणा दुसरीकडे मनीष नगर ते रॅडिसन ब्लू हॉटेलपर्यंत नवीन उड्डाणपुलालाही मंजुरी देण्यात आली आहे. ८२.३१ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या उड्डाणपुलाचा मनीषनगर आणि आजूबाजूच्या परिसराला मोठा फायदा होणार आहे. काही तांत्रिक बाबींचा विचार करून त्याच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात सल्लागारांशी चर्चा करण्यात आली आहे.
पाणी न साचण्यासाठी बॉक्स ड्रेनची निर्मिती दक्षिण पश्चिम नागपुरातील स्वावलंबीनगर आणि प्रतापनगर संकुलातही पावसाचे पाणी साचणार नाही. यासाठी १७.६२ कोटी रुपये खर्च करून बॉक्स ड्रेन तयार केले जातील. त्यामुळे जलद गतीने पाणी वाहून जाणे शक्य होणार आहे. जागतिक बँकेच्या आर्थिक साहाय्याने पीडब्ल्यूडीतर्फे राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
अंडरपासच्या कामाचीही निविदा अजनी टी पॉइंट ते टीबी वॉर्डदरम्यानचा सहा पदरी रस्ता आणि अंडरपासच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. लवकरच कार्यादेश देण्यात येईल. अजनी स्टेशन ते एफसीआय गोडाऊनदरम्यान टी पॉइंटवर लवकरच अंडरपासचे काम सुरू होणार आहे. रस्ता रुंदीकरणासाठी काही भागात रेल्वेची जमीन लागते, याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आला आहे. रेल्वेकडून मंजुरी मिळताच काम सुरू करण्यात येईल. - नितीन बारहाते, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (प्रकल्प),