पाचगावचा आराखडा पोहोचला दिल्लीत

By Admin | Updated: July 7, 2015 02:51 IST2015-07-07T02:51:49+5:302015-07-07T02:51:49+5:30

लंडन येथे ‘अर्बन प्लानिंग व डिझाईनिंग’ या विषयात विद्याविभूषित झाल्यानंतर तिथेच त्या तरुणाने...

The five-phase plan reached Delhi | पाचगावचा आराखडा पोहोचला दिल्लीत

पाचगावचा आराखडा पोहोचला दिल्लीत

विदर्भाच्या शिरपेचात तुरा : लंडनमधून परत आलेल्या तरुणाची मेहनत सार्थकी
अभय लांजेवार उमरेड
लंडन येथे ‘अर्बन प्लानिंग व डिझाईनिंग’ या विषयात विद्याविभूषित झाल्यानंतर तिथेच त्या तरुणाने यु.के. (युनायटेड किंगडम) ‘मास्टर प्लानिंग आणि लंडन आॅलम्पिक २०१२’ सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम केले. मूळच्या विदर्भातील अकोला येथील राहणाऱ्या तरुणाचे मन लंडनमध्ये चांगलेच रमले होते. परंतु आपल्या ज्ञानाचे चीज आपल्याच देशवासीयांसाठी झाले पाहिजे, हेच ध्येय ठेवून त्याने निर्णय पक्का केला. बॅग पॅक केली, विमान पकडले आणि थेट आपला देश गाठला. कालांतराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट झाली. गडकरींनी या आर्किटेक्टमधील कलाकौशल्य ओळखले आणि पाचगावचा आराखडा तयार करण्याचे कामही बिनदिक्कत ‘त्या’ तरुणाकडे सोपविले. अमित सतीश पिंपळे असे या तरुणाचे नाव. ‘लंडन टू पाचगाव’ असा हा त्याचा प्रवास.
३५ वर्षीय सतीशने सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी तयार केलेल्या ग्रामविकास आराखड्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी त्याची पाठ थोपटली. आता या विविध कामांचा आराखडा दिल्ली दरबारी पोहोचला आहे. त्यातही या योजनेच्या अनुषंगाने देशात केंद्र शासनाकडे सर्वप्रथम पाठविण्यात आलेल्या आराखड्याचीही नोंद झाली आहे. शिवाय ‘जनसहभागातून विकास आराखडा’ असे या आराखड्याचे आगळेवेगळे स्वरूपही आहे.
अकोला येथील अमित पिंपळे या तरुणाने पुणे विद्यापीठातून ‘आर्किटेक्ट’ केले. या दरम्यान पाचही वर्षे गोल्ड मेडालिस्ट म्हणून बहुमान पटकावला. सन २००२-०३ मध्ये लंडनला पदव्युत्तर शिक्षणासाठी झेप घेतली. लंडन मेट्रो पॉलेटीन विद्यापीठाची संपूर्ण शिष्यवृत्तीही अमितला बहाल करण्यात आली. सातत्याने आठ वर्षे या तरुणाने अहोरात्र मेहनत करीत लंडन, रशिया, चीन याठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव सोबतीला घेतला. स्मार्ट सिटी, मास्टर प्लानिंग आणि टाऊनशिपच्या क्षेत्रात सुमारे १५ वर्षे जीव ओतला. आता या आपल्या संपूर्ण अनुभवाची ताकद त्याने पाचगाव या आदर्श गावाच्या विकास आराखड्यासाठी लावली.
पाचगाववासीयांच्या प्रेमाने त्याच्यात चांगलीच ऊर्जा संचारली असून तो आता नागपूरवासीही झाला आहे. केवळ कागदोपत्री कामे करायचे असा प्रकार अमितने मुळीच केला नाही. पाचगावच्या राहणीमानाचा अगदी जवळून अभ्यास केला. भौतिक, आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमीही समजून घेतली. गावकऱ्यांशी सातत्याने चर्चा केली. या कामासाठी त्याला पहिल्या टप्प्यासाठी पाच ते सहा महिने लागले. वडील सतीश पिंपळे ज्येष्ठ आणि नामांकित चित्रकार, आई पद्मजा आणि पत्नी अपेक्षा यांनीही माझा आत्मविश्वास चांगलाच वाढविल्याचेही अमित सांगतो. मातृभूमीसाठी काम करण्याचा संकल्प त्याने व्यक्त केला असून ‘आर्किटेक्चर आणि टाऊनप्लॅनिंग’ या क्षेत्रासाठीही योगदान देण्याचा त्याचा मानस आहे. पैसे कुठेही कमवता येतात. परंतु आपल्या शिक्षणाचा सर्वांगिणदृष्टया विकासकामाला हातभार लावण्याचा आनंदही घेता आला पाहिजे, असेही तो म्हणाला.

लाखमोलाचा आराखडा
अमित पिंपळे याने आराखडा तयार करताना अगदी बारीकसारीक बाबींचा अंतर्भाव केला आहे. त्यामुळे एकूण ३५ कामांपैकी बहुतांश कामे मार्गी लागल्यास ‘पाचगाव खासगाव’ झाल्याचे चित्र लवकरच नजरेस पडेल. रस्ते आणि दळणवळण, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, शौचालय, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, कृषी, नवीन व्यवसाय, उद्योग, रोजगार, क्रीडा, सौंदर्यीकरण, नवीन नागरी सुविधा, डिजिटलायझेशन, ऊर्जास्रोतांची निर्मिती, घरकुल, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन या बाबींसह अनेक कामांचा समावेश यात असून हा आराखडा लाखमोलाचा ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Web Title: The five-phase plan reached Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.