पोलिसांसमोर गोळीबार करणारे 5 जण गजाआड, मुख्य आरोपी फरार
By Admin | Updated: November 16, 2016 08:56 IST2016-11-16T08:56:44+5:302016-11-16T08:56:44+5:30
नागपुरातील धरमपेठेतील लाहोरी बार येथे पोलिसांसमोर गोळीबार करणा-या कुख्यात गुंड शेखू खान आणि माया गँगच्या 5 गुंडांना मंगळवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीताबर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांसमोर गोळीबार करणारे 5 जण गजाआड, मुख्य आरोपी फरार
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - धरमपेठेतील लाहोरी बार येथे पोलिसांसमोर गोळीबार करणा-या कुख्यात गुंड शेखू खान आणि माया गँगच्या 5 गुंडांना मंगळवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीताबर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.
रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास लाहोरी बारमध्ये बसलेल्या एका तरुणीची छेड काढण्यावरुन सुरू झालेल्या हाणामारीनंतर कुख्यात गुंड शेखू, पप्पू डागोर, मिहीर मिश्रा, आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी लाहोरीवर हल्ला चढवत, बार मालक समीर शर्मावर गोळ्या झाडल्या.
त्यानंतर शर्माच्या तक्रारीवरुन सीताबर्डी पोलिसांनी शेखू खानसह त्याच्या अन्य साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवला. अन्य साथीदारांना अटक करण्यात आली असली तरी शेखू खानू, पप्पू आणि मिहीर हे मुख्य आरोपी पोलिसांच्या अद्याप हाती लागले नाहीत.
दरम्यान, तहसील परिसरात पोलिसांना एक संशयित कार दिसली, ही कार आरोपींची असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढत होत असून कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.