Five people, including two BSP candidates, were expelled | बसपाच्या दोन उमेदवारांसह पाच जणांची हकालपट्टी
बसपाच्या दोन उमेदवारांसह पाच जणांची हकालपट्टी

ठळक मुद्देपक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका : दोन नगरसेवक व एका प्रदेश सचिवाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत बसपाच्या पाच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यात नागपूर व सोलापूर येथील लोकसभेच्या उमेदवारासह दोन नगरसेवक आणि एका प्रदेश सचिवाचा समावेश आहे.
बसपाच्या प्रदेश कार्यालयीन सचिव असलेले उत्तम शेवडे यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातील बसपाचे उमेदवार मो. जमाल, सोलापूरचे उमेदवार राहुल सरोदे , प्रदेश सचिव नागोराव जयकर तसेच औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष व नगरेसवक महेंद्र सोनवणे, सोलापूरचे नगरसेवक आनंदा चंदनशिवे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. पक्षातील सूत्रानुसार लोकसभा निवडणुकीत बसपाची उमेदवारी मो. जमाल यांना मिळाल्यापासून पक्षात असंतोष पसरला होता. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा बसपाचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी मो. जमाल आणि प्रदेश सचिव जयकर यांच्याविरुद्ध उघडपणे नाराजी व्यक्त करीत होते. या दोघांचे इतर राजकीय पक्षाशी संगनमत असल्याचे आरोपही अनेक पदाधिकारी करीत होते. अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी या दोघांपासून फारकत घेतली होती. त्याचा परिणाम निवडणुकीतही बसपाला मिळालेल्या मतांवरून दिसून येतो. गेल्या निवडणुकीत ९६ हजारावर मते घेणाऱ्या बसपाच्या उमेदवाराला यंदा केवळ ३१,७२५ मते मिळाली. निवडणुकीनंतर पक्षातील ५० पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना एक निवेदन देत या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही. तेव्हा दोन दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन प्रभारी अशोक सिद्धार्थ यांची भेट घेतली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगणयात आली. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी कारवाई केली.
बसपाचे प्रदेश प्रभारी खा. अशोक सिद्धार्थ, प्रमोद रैना, प्रा. डॉ. ना.तू. खंदारे यांनी या पाचही जणांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पक्षाने म्हटले आहे.


Web Title: Five people, including two BSP candidates, were expelled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.