लाहोरी बारच्या संचालकासह पाच जणांना अटक
By Admin | Updated: November 19, 2016 02:35 IST2016-11-19T02:35:12+5:302016-11-19T02:35:12+5:30
रविवारी रात्री प्रतिस्पर्धी गुंडाच्या टोळक्यावर गोळीबार केल्याप्रकरणी धरमपेठेतील लाहोरी बारचा संचालक समीर प्रल्हाद शर्मा

लाहोरी बारच्या संचालकासह पाच जणांना अटक
विरोधी गटातील तरुणाची तक्रार : गोळीबार केल्याचा आरोप
नागपूर : रविवारी रात्री प्रतिस्पर्धी गुंडाच्या टोळक्यावर गोळीबार केल्याप्रकरणी धरमपेठेतील लाहोरी बारचा संचालक समीर प्रल्हाद शर्मा (वय ३२, रा. माया सदन, इंदोरा) याच्यासह पाच आरोपींवर गुन्हे दाखल केले. या पाचही आरोपींना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली.
रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास लाहोरी बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये पवन दयाराम चौधरी तसेच हर्षल राऊत, मिलिंद बोरकर आणि जयंत इटनकर दारू पीत होते. बाजूच्या टेबलवर रोशन आणि एक तरुणीही दारू पीत होती. तिला हातवारे, इशारे करून आरोपींनी नृत्य करण्याचा आग्रह धरला. त्यावरून पवन, त्याचे मित्र आणि रोशन व त्याच्या मित्रांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर बारमधील वेटर्सनी पवन आणि त्याच्या मित्रांना मारहाण करून हॉटेलबाहेर काढले.
त्यामुळे पवनने आपल्या साथीदारांना फोन केला. रात्री ११.३० च्या सुमारास स्कॉर्पिओ, स्कोडा आणि आॅल्टोमध्ये बसून कुख्यात शेखू खान, पप्पू डागोर आणि त्यांचे साथीदार आले. समोर पवन चौधरी होता. त्यांनी अश्लील शिवीगाळ करीत बारच्या दिशेने दगडफेक आणि गोळीबार केला. याप्रकरणी बारमालक समीर शर्माच्या तक्रारीवरून सोमवारी पोलिसांनी शेखू, पप्पू ,पवन तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.
प्रत्यक्षदर्शी पोलिसांची भूमिका संशयास्पद
लाहोरी बारच्या फायरिंगने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे, हा गोळीबार पोलिसांच्या डोळ्यादेखत झाला होता. त्यामुळे समीर आणि त्याच्या साथीदारांवर त्याच दिवशी गुन्हा दाखल होणार, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षदर्शी पोलिसांनी समीरने गोळी चालविल्याचा उल्लेख आपल्या बयानात किंवा वरिष्ठांना माहिती देताना केला नाही. त्यामुळे त्यावेळी एकाच गटातील आरोपींवर गुन्हे दाखल झाले. मात्र, अटक झालेल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांकडे पोहचवली.
दुसरे म्हणजे, गजबजलेल्या भागात भररस्त्यावर सिनेस्टाईल गोळीबार होत असल्याच्या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेतली गेली. त्यामुळे समीर शर्मा आणि त्याच्या साथीदारांवर शुक्रवारी हे गंभीर गुन्हे दाखल झाले आणि त्याला पळून जाण्याची किंवा जामिनाची संधी न देता पोलिसांनी तडकाफडकी अटकही केली.