पाच प्रवाशांना घातला गंडा
By Admin | Updated: March 6, 2015 00:26 IST2015-03-06T00:26:26+5:302015-03-06T00:26:26+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी चोरट्यांनी तीन प्रवाशांची नजर चुकवून त्यांचे पाकीट आणि दोन प्रवाशांचे मोबाईल पळविल्याच्या घटना गुरुवारी घडल्या.

पाच प्रवाशांना घातला गंडा
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी चोरट्यांनी तीन प्रवाशांची नजर चुकवून त्यांचे पाकीट आणि दोन प्रवाशांचे मोबाईल पळविल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. दरम्यान सर्वाधिक गर्दी असलेल्या चालू तिकीट कार्यालयात दुपारी एकही लोहमार्ग पोलीस ड्युटीवर हजर नसल्याचे दिसले.
नागपूर रेल्वेस्थानकावर चोरट्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात पाच प्रवाशांचे पाकीट आणि मोबाईल पळविण्याच्या घटना घडल्या. प्रवीण तीर्थराज गजभिये (२२) हा युवक भंडारा येथे जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आला. सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशातील पाकीट आणि मोबाईल पळविला. पाकिटात २ एटीएम कार्ड, दुचाकीचे आरसी बुक होते तर निलेश कुमार सिंग (२४) रा. मिर्झापूर उत्तर प्रदेश हा युवक परतवाडा जि. अमरावती येथे पोस्ट विभागाच्या प्रशिक्षणासाठी जात होता. तो चेन्नईवरून नागपूरला आला. चालू तिकीट कार्यालयात दुपारी २ वाजता तो आपला मोबाईल चार्जिंग करीत असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशातील पाकीट चोरून नेले. पाकिटात ११०० रुपये रोख, एटीएम, ओळखपत्र, पॅनकार्ड होते. सुरेशकुमार उदेलाल भेंडेकर (२५) रा. रजेगाव जि.गोंदिया हा युवक दुपारी गोंदियाला जाण्यासाठी दुपारी १.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ३ वर उभा होता. त्याचे तपकिरी रंगाचे पाकीट अज्ञात चोरट्याने पळविले. त्यात लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र होते. गरिबरथने पुण्यावरून नागपुरला आलेल्या स्नेहल प्रकाश मुरकुटे (२५) रा. मनिषनगर ही युवती सकाळी ९.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६ वर उतरली. तिचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात आरोपीने पळविला. राहुल विजय गुजर (२२) रा. वाडी हा लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर स्पेशल या गाडीने सायंकाळी ६.३० वाजता नागपुरात आला. तो प्लॅटफार्म क्रमांक ७ वर उतरला असता त्याचा कार्बन कंपनीचा मोबाईल अज्ञात आरोपीने खिशातून पळविला. लोहमार्ग पोलिसांनी याबाबत नोंद केली आहे. (प्रतिनिधी)