पाच ऐतिहासिक स्थळांची पुनर्बांधणी
By Admin | Updated: July 7, 2014 01:03 IST2014-07-07T01:03:36+5:302014-07-07T01:03:36+5:30
जिल्ह्याला लाभलेल्या ऐतिहासिक वारस्याची साक्ष हेमाडपंथी मंदिरे आजही देतात. या प्राचीन वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुर्दशा झाली. हा ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार

पाच ऐतिहासिक स्थळांची पुनर्बांधणी
नवीन झरे आढळले : तपोनेश्वरच्या टँकचे खोदकाम सुरू
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
जिल्ह्याला लाभलेल्या ऐतिहासिक वारस्याची साक्ष हेमाडपंथी मंदिरे आजही देतात. या प्राचीन वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुर्दशा झाली. हा ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील पाच ऐतिहासिक स्थळांची पुनर्बांधणी केली जात आहे.
दारव्हा मार्गावर तपोनेश्वर येथे हेमांद्री राजाने ऐतिहासिक शिवालयाची निर्मिती केली आहे. पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते. मुख्य मार्गापासून हाकेच्या अंतरावरील या मंदिराच्या परिसरात ५० फूट खोल आणि विस्तीर्ण जलकुंड आहे. ३० पायऱ्या असलेल्या या जलकुंडात पूर्वी बारमाही पाणी असायचे. कालांतराने जलकुंड क्षतिग्रस्त झाले. शिवालयाच्या विश्वस्तांनी जलकुंडाची पुनर्बांधणी, मंदिराच्या जीर्णोध्दारासह सुरक्षा भिंंत आणि सांस्कृतिक भवनाची मागणी पुरातत्व विभागाकडे केली होती. याची दखल घेत जलकुंडाच्या पुनर्बांधणीला प्रारंभ झाला आहे. जलकुंडातील गाळ काढण्याच्या कामाला सरुवात झाली. तेव्हा त्यात नव्याने सात पायऱ्या गवसल्या. जलकुंडाचा पायवा विटांनी बांधला आहे. यावरून तत्कालिन बांधकामाचे तंत्र लक्षात येते.
आणखी चार स्थळांचे
काम सुरू होणार
यानंतर पुढील काळात येळाबारा, रूईवाई, राऊत सावंगी आणि महागाव येथील ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली येणार आहेत. तेथील धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी होणार आहे.