लाहोरी गोळीबार प्रकरणात पाच गजाआड
By Admin | Updated: November 16, 2016 02:58 IST2016-11-16T02:58:19+5:302016-11-16T02:58:19+5:30
पोलिसांच्या डोळ्यादेखत धरमपेठेतील लाहोरी बारसमोर गोळीबार करणाऱ्या कुख्यात शेखू आणि माया गँगच्या

लाहोरी गोळीबार प्रकरणात पाच गजाआड
कुख्यात फरार : पोलिसांची शोधाशोध सुरू
नागपूर : पोलिसांच्या डोळ्यादेखत धरमपेठेतील लाहोरी बारसमोर गोळीबार करणाऱ्या कुख्यात शेखू आणि माया गँगच्या पाच गुंडांना मंगळवारी सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पोलीस त्यासाठी शोधाशोध करीत आहेत.
रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास लाहोरीच्या आतमध्ये बसलेल्या एका तरुणीची छेड काढण्यावरून सुरू झालेल्या हाणामारीनंतर कुख्यात शेखू, पप्पू डागोर, मिहीर मिश्रा, आनंद, राहुल, भुऱ्या आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी लाहोरीवर हल्ला चढवला. बार संचालक समीर शर्माच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर शर्माच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी शेखू खान, पप्पु डागोर, रविश, पवन चौधरी, आनंद तसेच त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. यातील पवन चौधरी (वय २२) याला तहसील पोलीस ठाण्यात सोमवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने मिलिंद बोरकर (वय ३१)आणि हर्षल राऊत (वय २६) या दोघांना पकडले. रात्री पुन्हा टिंग्या ऊर्फ आकाश चव्हाण (वय २४)आणि स्वप्नील भोयर (वय २४) या दोघांना अटक करण्यात आली.
कुख्यात शेखू आणि पप्पू तसेच मिहीर अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. सोमवारी रात्री तहसील परिसरात पवनसोबत आणखी दोन ते तीन जण होते, ते कोण होते, त्याबाबत उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान, सदर परिसरात बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या एका कारचीही पोलिसांनी तपासणी केली. ती कार आरोपींची असल्याची चर्चा होती. पोलिसांनी मात्र त्याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
‘गेम’ ची तयारी
दीड महिन्यापूर्वी लाहोरीपासून हाकेच्या अंतरावर कुख्यात सचिन सोमकुंवरची हत्या झाली. तेव्हापासून गुंडांच्या एका टोळीने या खुनामागे असल्याच्या संशयावरून एकाच्या ‘गेम’ ची तयारी केली असल्याची जोरदार चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे. रविवारी रात्री थोडक्यात गेम हुकल्याचेही बोलले जाते. पोलिसांच्या कानावर ही चर्चा गेल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण फारच गांभीर्याने घेतले असून, मंगळवारी पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या साप्ताहिक गुन्हे आढावा बैठकीतही (क्राईम मिटींग) या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली.