सफाई कामगारांच्या वेतनात पाच कोटींचा घोळ
By Admin | Updated: March 21, 2017 01:55 IST2017-03-21T01:55:47+5:302017-03-21T01:55:47+5:30
नागपूर शहरातील कचरा उचलणे व वाहून नेण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मधील कामगारांना नियमानुसार वेतन दिले जात नाही.

सफाई कामगारांच्या वेतनात पाच कोटींचा घोळ
हजारो कामगारांची मनपावर धडक : आयुक्तांच्या कक्षापुढे ठिय्या
नागपूर : नागपूर शहरातील कचरा उचलणे व वाहून नेण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मधील कामगारांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. अशा प्रकारे गेल्या ११ महिन्यात कनक रिसोर्सेसने ५ कोटी १५ लाखांचा घोळ केला आहे. याविरोधात वारंवार निवेदने दिल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने सोमवारी हजाराहून अधिक कामगारांनी महापालिका कार्यालयावर धडक दिली. थेट आयुक्तांच्या कक्षासमोरील मोकळ्या जागेत तीन तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती.
महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनतर्फे कामगारांच्या मागण्यासंदर्भात महापालिका प्रशासन व कनक रिसोर्सेस व्यवस्थापनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली. परंतु कामगारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. जानेवारी महिन्यात संघटनेच्या प्रतिनिधींनी कनक व्यवस्थापनासोबत चर्चा केली होती. नियमानुसार कामगारांना दरमहा १४१६० ते १६६६० रुपये वेतन मिळणे अपेक्षित आहे. परंतु कामगारांना ७००० ते ८५०० रुपये वेतन दिले जाते. कनक रिसोर्सेसकडून सफाई कामगारांवर अन्याय केला जातो. कामगारांना वेतनाची पावती दिली जात नाही. एक दिवसाची सुटी घेतल्यास तीन दिवसाचे वेतन कपात केले जाते. कामाच्या २६ दिवसाऐवजी २८ किंवा ३० दिवसांचा महिना धरला जातो. अशा प्रकारे दर महिन्याला तीन ते चार दिवसाच्या वेतनाची कपात केली जाते. १८ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१६ या कालावधीतील किमान वेतनाचे ३ कोटी १५ लाख कामगारांना देण्यात आलेले नाही. कामगारांना नियमानुसार भत्ता देणे आवश्यक आहे. परंतु आजवर कामकारांना भत्ता मिळालेला नाही. ही रक्कम दोन कोटींच्या आसपास आहे.
कामगारांच्या मागण्यासंदर्भात महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन कामगार संघटक सिद्धार्थ प्रभुणे व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन सादर करून कामगारांना न्याय देण्याची मागणी केली. महापालिका प्रशासनाकडून कामगारांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले. कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रफुल्ल गुडधे व सिद्धार्थ प्रभुणे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)