नागपुरात चोरट्यांचा सुळसुळाट; हुडकेश्वरमध्ये २४ तासात पाच घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 06:33 PM2022-05-30T18:33:33+5:302022-05-30T18:48:06+5:30

चोरांकडून कुलूप लावलेल्या घरांना ‘टार्गेट’ करण्यात येत असून, पोलिसांकडून गंभीरतेने गस्त होते की नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Five burglaries in 24 hours in Hudkeshwar area of nagpur | नागपुरात चोरट्यांचा सुळसुळाट; हुडकेश्वरमध्ये २४ तासात पाच घरफोड्या

नागपुरात चोरट्यांचा सुळसुळाट; हुडकेश्वरमध्ये २४ तासात पाच घरफोड्या

Next
ठळक मुद्देपोलिसांचा वचक नाहीच : बाहेरगावी जायचे कसे? ‘आऊटर’ भागात नागरिकांमध्ये दहशत

नागपूर : शहरातील घरफोड्यांचे सत्र वाढतच असून दररोज यासंदर्भातील प्रकरणे समोर येत आहेत. विशेषत: शहराच्या ‘आऊटर’ भागातील नागरिकांमध्ये यामुळे दहशत निर्माण झाली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर २४ तासातच पाच घरफोड्यांची नोंद झाली. चोरांकडून कुलूप लावलेल्या घरांना ‘टार्गेट’ करण्यात येत असून, पोलिसांकडून गंभीरतेने गस्त होते की नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

गजानननगर येथील विजय राघोर्ते हे कुटुंबीयांसह २८ मे रोजी लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बाहेरगावी गेले. २९ मे रोजी मध्यरात्री दीडनंतर ते घरी पोहोचले. घराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत होते. घरातील विविध खोल्यांमधील कपाटेदेखील उघडली होती व सामान अस्ताव्यस्त पडले होते. राघोर्ते कुटुंबीय लग्नाला गेल्याने बहुतांश दागिने घेऊनच गेले होते व घरात रोखदेखील कमी होती. चोरांनी २३ हजार रुपयाचा माल लंपास केला. परंतु या घटनेमुळे कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे.

चंद्रपूर मनपा अधिकाऱ्याचे घर ‘टार्गेट’

दुसरी घटना इंदिरानगर सूर्यकिरण सोसायटी येथे घडली. चंद्रपूर महानगरपालिकेचे अधिकारी प्रकाश बांते यांच्या पत्नी प्रियंका या मुलगा व मुलीसह २३ मे रोजी नागपुरातीलच त्यांच्या आईकडे राहायला गेल्या होत्या. घराला त्या व्यवस्थितपणे कुलूप लावून गेल्या होत्या. त्या घरी परत आल्या असता घरातील सामान फेकलेले होते व चोरांनी दागिने व इतर सामान मिळून ३८ हजाराचा माल चोरून नेला

केदारनाथला गेलेल्या सासूकडे चोरी

महात्मा गांधीनगर, न्यू नरसाळा रोड येथील वंदना घोडसे या १७ मे रोजी केदारनाथ येथे दर्शनासाठी गेल्या. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे जावई संजय देवगीरकर व त्यांचा मुलगा त्यांच्या घरी चकरा मारून नियमितपणे तपासणी करीत होते. दोन दिवसाअगोदर त्यांचा मुलगा अभ्यासासाठी गेला असता घरातील कुलूप व साखळ्या तुटलेल्या दिसून आल्या. तातडीने देवगीरकरदेखील तेथे पोहोचले. सासू नसल्याने नेमका किती माल चोरी गेला आहे, हे लक्षात आले नाही. सासूशी फोनवर संपर्क झाल्यावर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली.

‘मेट्रो’ कर्मचाऱ्याचे घर फोडले

न्यू अमरनगर निवासी व मेट्रोतील कर्मचारी जगदीश नागपुरे हे कुटुंबीयांसह महाराष्ट्र दर्शनाला गेले असता त्यांचे घरदेखील चोरट्यांनी फोडले. झाडाला दररोज पाणी टाकण्याची जबाबदारी त्यांनी काम करणाऱ्या महिलेवर सोपविली होती. एका सायंकाळी महिला पाणी टाकण्यासाठी गेली असता, शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तोडल्याचे सांगितले. याची सूचना मिळाल्यावर नागपुरे परतले. बाहेरगावी जाण्याअगोदर त्यांनी रोख रक्कम व दागिने नातेवाईकांकडे ठेवले होते. तरीदेखील त्यांच्या घरातील ५५ हजाराचा माल चोरीला गेला.

मनपा कर्मचाऱ्याच्या सासूचे घर लुटले

इंद्रनगर येथील निवासी अपर्णा येवले या त्यांच्या नातेवाईकांकडे राहायला गेल्या होत्या. त्यांच्या शेजाऱ्यांनी घरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर येवले यांचे जावई व मनपातील कर्मचारी जितेश धकाते हे तेथे पोहोचले. सासूशी फोनवर संपर्क करून त्यांनी नेमका किती माल चोरी गेला, याची चाचपणी केली. चोरांनी १० हजाराचा माल चोरून नेल्याची बाब समोर आली.

सतर्कतेमुळे वाचले लाखोंचे दागिने

घराबाहेर जात असताना दागिने, रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी, असे वारंवार पोलिसांकडून सांगण्यात येते. मात्र लोक त्याचे पालन करत नाहीत. पाच गुन्ह्यांपैकी दोन प्रकरणात फिर्यादींनी रक्कम व दागिने घरी ठेवले नव्हते. त्यामुळे त्यांचे जास्त नुकसान झाले नाही.

Web Title: Five burglaries in 24 hours in Hudkeshwar area of nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.