पाच आरोपी अटकेत
By Admin | Updated: May 30, 2015 02:57 IST2015-05-30T02:57:17+5:302015-05-30T02:57:17+5:30
जुन्या वैमनस्यातून प्रतिस्पर्ध्यावर माऊजरने गोळीबार करणाऱ्या गिजऱ्या लोणारे आणि त्याचे चार साथीदार अजनी पोलिसांच्या हाती लागले आहे.

पाच आरोपी अटकेत
अजनी गोळीबार प्रकरण: माऊजर-तलवार व चाकू सापडले
नागपूर : जुन्या वैमनस्यातून प्रतिस्पर्ध्यावर माऊजरने गोळीबार करणाऱ्या गिजऱ्या लोणारे आणि त्याचे चार साथीदार अजनी पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याजवळून माऊजर, तलवार आणि चाकू सापडल्याची माहिती आहे. गिजऱ्याचाच साथीदार गोलू बोरकरने अमोल मेहर आणि त्याच्या साथीदारांनी सुद्धा हल्ला केल्याची तक्रार केली आहे.
गुरुवारी रात्री गिजऱ्या गोलू बोरकर, दिनेश धोबी, विक्की रोकडे, गुड्डू निखारे यांनी साथीदारांच्या मदतीने अमोल मेहरच्या घरावर हल्ला केला. माऊजर आणि तलवार घेऊन असलेल्या गुंडांनी हवेत गोळीबार केला. तसेच अमोलला जखमी केले. वस्तीतील वाहनांची तोडफोड केली
सूत्रांनुसार गुन्हेगार गोलु बोरकर हा क्रिकेट सट्टेबाज आहे. अमोल मेहर कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वीच वस्तीत परतला होता. परत आल्यावर त्याचा गोलूसोबत वाद झाला. गोलूवर अमोल भारी पडत होता. तो गोलूला खंडणी मागत होता. गुरुवारी सायंकाळी अमोल आपल्या साथीदारासोबत गोलूच्या घरी गेला. गोलू घरी नव्हता. त्याने त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली. ते आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेले. अमोलकडून आपल्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन गोलू, गिजऱ्या व इतर साथीदारासोबत अमोलच्या घरी आला त्याने हवेत गोळीबार करीत अमोलच्या घरावर हल्ला केला. अमोल पळून गेला. अमोल आणि त्याच्या साथीदारांनीही गोळीबार केल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. अजनी पोलीस गुरुवारी रात्रीपासूनच आरोपीच्या शोधात फिरत होते. गोळीबारीची घटना असल्याने गुन्हे शाखा पोलीसही सतर्क झाले होते. शुक्रवारी रात्री गोलूसह इतर पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. (प्रतिनिधी)
गँगवारची १० दिवसात दुसरी घटना
शहरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दहा दिवसात गँगवारची ही दुसरी घटना आहे. १९ मे रोजी यावाच्या कुटुंबीयांनी जरीपटका येथील हुडको कॉलनीतील एका व्यक्तीच्या घरावर हल्ला केला होता. वाहनांची तोडफोड केली होती. यानंतर पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना घरी पाठविण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर पुन्हा तशाच प्रकारची गँगवारची घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी पाच काडतूसही सापडले होते. यापैकी एक जिवंत काडतूस होते.