‘विठाबाई’ नाटकाला प्रथम पारितोषिक
By Admin | Updated: December 5, 2014 00:38 IST2014-12-05T00:38:26+5:302014-12-05T00:38:26+5:30
५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्रावरून अंकुर मानव समाज उत्थान केंद्र, नागपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘विठाबाई’ या नाटकाला २० हजार रुपयांचे निर्मितीचे प्रथम पारितोषिक

‘विठाबाई’ नाटकाला प्रथम पारितोषिक
राज्य नाट्य स्पर्धा : ‘कमेला’ द्वितीय तर ‘घर हरविलेली माणसं’ तृतीय स्थानी
नागपूर : ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्रावरून अंकुर मानव समाज उत्थान केंद्र, नागपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘विठाबाई’ या नाटकाला २० हजार रुपयांचे निर्मितीचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर केंद्रावरील निकाल आज जाहीर केला. विठाबाई या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
नागपूर केंद्रावरून १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार बोधी फाऊंडेशनने सादर केलेल्या ‘कमेला’ या नाटकाला तर तृतीय पुरस्कार महिन्द्र अॅण्ड महिन्द्र सांस्कृतिक मंडळाने सादर केलेल्या ‘घर हरविलेली माणसं’ या नाटकाला निर्मितीचा १० हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय दिग्दर्शनाचे प्रथम संजय जीवने (विठाबाई), द्वितीय श्याम मोहरील (घर हरविलेली माणसं), नेपथ्याचे प्रथम संजय काशीकर (घर हरविलेली माणसं) आणि द्वितीय मनोज वासनिक (कमेला), प्रकाशयोजनेचे प्रथम शिवशंकर माळोदे (घर हरविलेली माणसं) आणि द्वितीय मिथून मित्रा (कमेला) यांना जाहीर करण्यात आले. रंगभूषेचे प्रथम पारितोषिक बाबा खिरेकर (विठाबाई) आणि वासंती यांना ऋतुस्पर्श नाटकासाठी जाहीर झाले आहे. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक श्रीराम जोग (डहूळ) आणि सांची जीवने यांना विठाबाई नाटकासाठी देण्यात आले. अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्र सीमा गोडबोले (क्षण एक पुरे प्रेमाचा), रेणुका चुटके (ऋतुस्पर्श), कल्याणी गोखले (चलती का नाम गाडी), केतकी कुळकर्णी (तो एक उंबरठा), श्याम मोहरील (घर हरविलेली माणसं), श्रीकांत भोगले (केस नं. ९९), विनय मोडक (आजही कैकयी) आणि अतुल सोमकुंवर यांना ‘हिटलर की आधी मौत’ या नाटकासाठी जाहीर करण्यात आली आहेत.
१७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत सायंटिफिक सभागृहात जल्लोषात सादर झालेल्या या स्पर्धेत एकूण १३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रमेश कदम, सुरेश खालविलकर आणि अनिल कुळकर्णी यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)