मेळघाटातील पहिला आयएएस संतोष सुखदेवे
By Admin | Updated: June 4, 2017 17:03 IST2017-06-04T17:03:33+5:302017-06-04T17:03:33+5:30
देशातील सर्वात मोठी नागरी परीक्षा उत्तीर्ण करून मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील पहिला आयएएस होण्याचा मान पटकावणाऱ्या संतोष सुखदेवे याने आई-वडिलांसोबतच मेळघाटचे नावदेखील उज्ज्वल केले आहे

मेळघाटातील पहिला आयएएस संतोष सुखदेवे
श्यामकांत पाण्डेय ।
धारणी : देशातील सर्वात मोठी नागरी परीक्षा उत्तीर्ण करून मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील पहिला आयएएस होण्याचा मान पटकावणाऱ्या संतोष सुखदेवे याने आई-वडिलांसोबतच मेळघाटचे नावदेखील उज्ज्वल केले आहे. मेळघाटातील नारवाटीसारख्या अत्यंत लहानशा आदिवासी पाड्यातील रहिवासी संतोष गुणवंत सुखदेवे याचे हे यश निश्चितच स्पृहणीय आहे.
धारणी तालुक्यातील नारवाटीसारख्या अत्यंत लहान आदिवासी पाड्यातील रहिवासी संतोष सुखदेवे याने नुकतेच भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ची परीक्षा ५४६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याने ‘लोकमत’शी खास बातचित करताना त्याच्या संघर्षयात्रेचे मार्मिक वर्णन केले. संतोषचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नारवाटी येथे झाले. त्यानंतर पुुढील शिक्षणासाठी त्याने कळमखार येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथे पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. नारवाटी ते कळमखार असे तीन किलोमीटर अंतर पायी तुडवून त्याने शिक्षण घेतले. कळमखार शाळेतील शिक्षक गौतम वानखडे यांनी त्याची शिक्षणाप्रतीची आवड आणि चिकाटी पाहून त्याला नवोदय विद्यालयाची परीक्षा देण्यास सांगितले. संतोषने नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आणि त्यांचा शिक्षणाचा खरा प्रवास सुरू झाला.
अमरावती येथील नवसारी परिसरातील जवाहर नवोदय विद्यालयात संतोषला प्रवेश मिळाला आणि येथे त्याने इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सिव्हील इंजिनिअरिंंगची पदवी घेण्यासाठी तो पुण्याला गेला. पुणे येथे चार वर्षे त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत काढले. कपड्यांचे अवघे दोन जोड त्यांच्याकडे होते. मेसमध्ये झुणका भाकरी खाऊन त्यांनी ही चार वर्षे कशीबशी काढली. अभियांत्रिकीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही त्याची शिक्षणाची भूक संपली नाही. ‘बार्टी’संस्थेकडून दरवर्षी परीक्षा घेऊन ५० होतकरू विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या परीक्षेत संतोष उत्तीर्ण झाला. पुढील कोचिंगसाठी त्याला याच संघटनेने संपूर्ण खर्च पत्करून दिल्लीला पाठविले. दिल्लीत सन २०१५ मध्ये कोचिंग पूर्ण केल्यावर सन २०१६ मध्ये नागरी प्रवेशपूर्व परीक्षा त्याने उत्तीर्ण केली. आता सन २०१६ च्या डिसेंबर महिन्यात त्याने प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली आणि ५४६ व्या क्रमांकाने ती उत्तीर्णदेखील केली.
सुखदेवे कुटुंबाची अवघी ९२ आर. हेक्टर शेती नारवाटीला आहे. अत्यंत कमकुवत आर्थिक परिस्थितीतून संतोषने मिळविलेले हे यश म्हणूनच नेत्रदीपक आहे.
सुरूवातीपासूनच संतोष सुखदेवेला शिक्षणाची आवड होती. त्यासाठी परिश्रम करण्याचीसुद्धा तयारी होती. मी त्याला केवळ मार्गदर्शन केले. आज त्याने आयएएस होऊन मेळघाटचे नाव उज्ज्वल केले आहे.
- गौतम वानखडे,
शिक्षक