हजसाठी पहिला जत्था आज रवाना होणार

By Admin | Updated: September 23, 2014 01:08 IST2014-09-23T01:08:50+5:302014-09-23T01:08:50+5:30

हज यात्रेकरूंचा पहिला जत्था उद्या (मंगळवारी) सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हजसाठी रवाना होणार आहे. यात एकूण ४७० यात्रेकरूंचा समावेश राहणार आहे.

The first group for Haj will be leaving today | हजसाठी पहिला जत्था आज रवाना होणार

हजसाठी पहिला जत्था आज रवाना होणार

दोन विमाने उडणार : ४७० यात्रेकरूंचा समावेश
नागपूर : हज यात्रेकरूंचा पहिला जत्था उद्या (मंगळवारी) सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हजसाठी रवाना होणार आहे. यात एकूण ४७० यात्रेकरूंचा समावेश राहणार आहे. या यात्रेसाठी गत दोन दिवसांपासून हज हाऊस येथे शेकडो मुस्लीम बांधव गोळा झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावर हजला जाण्याचा आनंद झळकत आहे. त्यामुळे गत दोन दिवसांपासून हज हाऊसमधील संपूर्ण वातावरण आनंदमय झाले आहे.
माहिती सूत्रानुसार उद्या (मंगळवारी) सकाळी ६.२० वाजता पहिले विमान उड्डाण भरणार आहे. यानंतर लगेच सकाळी १०.३० वाजता दुसरे विमान उड्डाण घेईल. या दोन्ही विमानात प्रत्येकी २३५ प्रमाणे एकूण ४७० यात्रेकरूंचा समावेश राहणार आहे. यासाठी हज हाऊस येथे सोमवारपासूनच रिपोर्टिंग सुरू झाली आहे. शिवाय सकाळी ६.२० वाजता उड्डाण घेणाऱ्या विमानातील यात्रेकरूंना आज रात्री २ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचविले जाणार आहे. तसेच दुसऱ्या विमानातील प्रवासी सकाळी ५ वाजतापर्यंत विमानतळावर पोहोचतील. सेंट्रल तंजीम कमिटीचे अध्यक्ष हाजी अब्दुल कदीर यांच्या मते, या दोन्ही विमानात नागपूरसह विदर्भातील विविध शहरातील हज यात्रेकरूंचा समावेश राहणार आहे. नियमानुसार यात्रेच्या दोन दिवसांपूर्वी रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे. त्यानुसार आतापर्यंत सर्व यात्रेकरूंनी हज हाऊस येथे हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे, या सर्व यात्रेकरूंना एक दिवसापूर्वीच तिकीट व पासपोर्ट देण्यात आले असून, सोमवारी रात्री इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The first group for Haj will be leaving today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.