पहिल्याच दिवशी गणवेश
By Admin | Updated: May 19, 2014 00:51 IST2014-05-19T00:51:38+5:302014-05-19T00:51:38+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते. जून महिन्यात शाळा सुरू होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ८३,२२६ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले

पहिल्याच दिवशी गणवेश
सर्व शिक्षा अभियान : जिल्ह्यातील ८३ हजार विद्यार्थ्यांना लाभ
नागपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते. जून महिन्यात शाळा सुरू होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ८३,२२६ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान विभागातील अधिकार्यांनी दिली. जिल्ह्यात १५८२ शासकीय शाळा आहेत. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांचा समावेश आहे. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकासोबतच गणवेश वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३ कोटी ३३ लाखांच्या खर्चाला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मंजुरी दिली आहे. गणवेश वाटप योजनेचा लाभ जिल्ह्यातील ५०,८०८ मुलींसह अनुसूचित जाती ९०४५, अनुसूचित जमाती ८४१९ व दारिद्र्य रेषेखालील १४,७४८ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. गणवेशासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थी ४०० रुपयाचा निधी दिला जातो. शासनाकडून निधी प्राप्त होताच सर्व शिक्षा अभियानातर्फे तो शाळांना वितरित केला जाणार आहे. मोफत गणवेश वाटपासाठी पात्र शाळांची तालुकानिहाय संख्या अशी :- नागपूर १४२, हिंगणा १२८, कामठी ८२, काटोल १४४, नरखेड १२०, सावनेर १२३, कळमेश्वर ९०, रामटेक १४०, मौदा १२७, पारशिवनी १००, उमरेड १२८, कुही १४७ व भिवापूर तालुक्यातील १०९ शाळांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)