पहिल्याच दिवशी ‘हल्लाबोल’
By Admin | Updated: December 7, 2014 00:27 IST2014-12-07T00:27:14+5:302014-12-07T00:27:14+5:30
काँग्रेसतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ८ डिसेंबर रोजी विधानभवनावर ‘हल्लाबोल मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीकरिता नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीची सभा जिल्हा

पहिल्याच दिवशी ‘हल्लाबोल’
काँग्रेस सज्ज : शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ व्हावे
नागपूर : काँग्रेसतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ८ डिसेंबर रोजी विधानभवनावर ‘हल्लाबोल मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीकरिता नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीची सभा जिल्हा ग्रामीण कार्यालयात पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे, ओलितासाठी १२ तास वीज पुरवठा करावा, दुष्काळग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तर फळबागासाठी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, महाराष्ट्रातील दलितांवर व महिलांवर अन्याय, अत्याचाराला आळा घालण्यात यावा, या प्रमुख मागण्यांकरिता काँग्रेसतर्फे सोमवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन वासनिक यांनी केले. काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणीला सुरुवात झाली असून, पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी गाव व बुथनिहाय क्रियाशील सभासद बनविण्याकरिता नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करून सर्व समाजातील घटकांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणावे , असे आवाहनही त्यांनी केले. नवनिर्वाचित आमदार सुनील केदार यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. बैठकीला या वेळी जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे , नाना गावंडे, दीपक काटोले, माजी आमदार देवराव रडके, एस.क्यू. जमा, बाबूराव तिडके, बाबूराव झाडे, हुकूमचंद आमधरे, शांता कुंभरे, कुंदा राऊत, मनोहर कुंभारे, दिनेश ठाकरे, प्रकाश वसू, नाना कंभाले, देवराव आमधरे, जॉनी मेश्राम उपस्थित होते. (प्रतिनिधी)