नागपुरी संत्र्याची पहिली खेप दुबईला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 23:49 IST2020-02-14T23:47:16+5:302020-02-14T23:49:37+5:30
नागपुरी संत्र्याची पहिली खेप गुरुवारी वाशी, नवी मुंबई येथून दुबईकडे रवाना करण्यात आली. व्हॅनगार्ड हेल्थ केअर फॅसिलिटीमधून संत्र्याचे १५०० क्रेट्स रेफ्रिजरेटेड कंटेनरमध्ये चढविण्यात आले.

नागपुरी संत्र्याची पहिली खेप दुबईला रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरी संत्र्याची पहिली खेप गुरुवारी वाशी, नवी मुंबई येथून दुबईकडे रवाना करण्यात आली. व्हॅनगार्ड हेल्थ केअर फॅसिलिटीमधून संत्र्याचे १५०० क्रेट्स रेफ्रिजरेटेड कंटेनरमध्ये चढविण्यात आले.
नागपुरी संत्र्याची गुणवत्ता जगात सर्वोत्तम आहे. संत्र्याला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी लोकमत समूह वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नरत असतो. याच प्रयत्नांतर्गत नागपुरी संत्र्याची पहिली खेप दुबईला पाठविण्यात आली. आता मध्य आणि पश्चिम भारतात संत्र्याचे उत्पादन दरवर्षी वाढत आहे. मृग बहारचे संत्री फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात. या संत्र्याच्या निर्यातीची भरपूर शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागानुसार नागपूर जिल्ह्यात ४० लाख हेक्टरवर संत्र्याचे उत्पादन घेण्यात येते. वरुड, काटोल, सावनेर, कळमेश्वर आणि नरखेड प्रमुख संत्रा उत्पादक क्षेत्र आहे. कृषी निर्यात धोरण (एईपी) लागू झाल्यानंतर अपेडातर्फे नागपूर जिल्ह्यात ऑरेंज क्लस्टर विकसित केले आहे. मुंबई स्थित अपेडाच्या अधिकाऱ्यांना एईपी लागू करणे आणि ऑरेंज क्लस्टर विकसित करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. एवढेच नव्हे तर क्लस्टर डेव्हलपमेंट कमिटी बनविली आहे. गेल्यावर्षी नागपूर ऑरेंज क्लस्टर विषयावर बायर-सेलर बैठक आणि प्रशिक्षणाचे आयोजन वनामती, नागपूर येथे करण्यात आले. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १५० शेतकरी, कंपन्या आणि सात निर्यातदारांनी भाग घेतला. नागपुरी संत्र्याची खाडी देशांमध्ये निर्यात वाढविण्यासह ब्रॅण्डिंगवर भर देण्यात आला. सोबतच निर्यातदारांना निर्यात करताना प्रत्येक फळाचे लेबलिंग आणि नागपुरी संत्र्याचे के्रट्स महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय विभिन्न सरकारी विभागातर्फे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात फिल्ड व्हिजिट करण्यात आली. त्यानंतर निर्यातदारांनी नागपुरी संत्रा निर्यात करण्यात रस दाखविला. जानेवारी महिन्यात पुन्हा एक फिल्ड व्हिजिट करण्यात आली.
त्यानंतरच एका निर्यातदाराने वरुड येथील शेतकऱ्याकडून संत्रा खरेदी करून अपेडाच्या वाशी, नवी मुंबई येथील व्हीएचटी फॅसिलिटीमध्ये पाठविला. व्हीएचटी पॅक हाऊसमध्ये संत्र्याचे ग्रेडिंग आणि सार्टिंग करण्यात आले. निर्यातदारांनी १० किलो प्रति क्रेटच्या हिशेबाने नवीन प्लास्टिक क्रेट्स डिझाईन आणि विकसित केले. नागपुरी संत्र्यांनी भरलेले असे १५०० क्रेट्स रेफ्रिजरेटेड कंटेनरमध्ये चढविण्यात आले. सन २०२८ मध्ये संत्र्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ १०१८३ दशलक्ष डॉलरची होती. भारतात सन २०१८-१९ मध्ये मॅन्डरीन, क्लॅमेन्टाईन जातीच्या संत्र्याचे ८७८१ हजार टन उत्पादन झाले होते.