आसारामबापूच्या समर्थकावर गोळीबार
By Admin | Updated: January 17, 2017 02:07 IST2017-01-17T02:07:05+5:302017-01-17T02:07:05+5:30
आसारामबापूच्या समर्थकांवर दुसऱ्या गटाच्या युवकांनी धावत्या कारच्या खिडकीतून गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आसारामबापूच्या समर्थकावर गोळीबार
धावत्या कारमधून दुसऱ्या गटाने झाडल्या गोळ्या : आश्रमच्या संपत्तीचा वाद
नागपूर : आसारामबापूच्या समर्थकांवर दुसऱ्या गटाच्या युवकांनी धावत्या कारच्या खिडकीतून गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी रात्री गोरेवाडा रिंग रोडवर ही घटना घडली.
फिर्यादी राजू जोशी (२९) रा. इतवारी यांनी यासंदर्भात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जोशी हे आसारामबापूचे साधक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कळमेश्वर रोड फेटरी येथे आसारामबापूंचा आश्रम आहे. या आश्रमाच्या संपत्तीच्या दुरुपयोगावरून २००७ साली साधकांमध्ये दोन गट तयार झाले आहेत. काही वर्षांपूर्वी राहुल यांना मारहाणसुद्धा झाली होती. तसेच आसारामबापूच्या न्यायालयीन प्रकरणात वकिलावरूनसुद्धा दोन्ही गटामध्ये वाद निर्माण झालेला आहे. फिर्यादी राहुल जोशी गटाचे म्हणणे आहे की, बापूचे प्रकरण आश्रमातीलच एखादा साधक वकील लढण्यास सक्षम आहे. तर दुसऱ्या गटाला असे वाटते की एखाद्या बाहेरच्या वकिलाची मदत घेण्यात यावी.
यावरून दोन्ही गट आमोरासमोर आले आहेत. दरम्यान शनिवारी रात्री ९.३० वाजता राहुल जोशी फेटरी येथील आश्रममधून आपल्या कारने (एमएच/४९/बी/३८७३) गोरेवाडा रिंगरोडने घराकडे परतत होते. रिंग रोडवर राहुलच्या कारमागून एक कार ओव्हरटेक करीत आली. कारमध्ये आरोपी मुनीत ऊर्फ पीयूष आणि त्याचा साथीदार बसले होते. थोडा वेळपर्यंत सोबत कार चालत होती. नंतर अचानक राहुलच्या ड्रायव्हर सीटच्या बंद खिडकीवर गोळीबार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सुदैवाने ती गोळी काच फोडून राहुलला स्पर्श करीत निघून गेली. जोशी यांनी रविवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)