माजी मंत्र्याच्या मुलाकडून गोळीबार

By Admin | Updated: February 23, 2015 02:22 IST2015-02-23T02:22:38+5:302015-02-23T02:22:38+5:30

सुरक्षा रक्षकाने कार पार्किंग करण्यास मज्जाव केल्याने, चिडलेल्या एका माजी मंत्र्याच्या मुलाने आपल्या पिस्तूलातून सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला.

Firing by a former minister's son | माजी मंत्र्याच्या मुलाकडून गोळीबार

माजी मंत्र्याच्या मुलाकडून गोळीबार

नागपूर : सुरक्षा रक्षकाने कार पार्किंग करण्यास मज्जाव केल्याने, चिडलेल्या एका माजी मंत्र्याच्या मुलाने आपल्या पिस्तूलातून सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला. सुदैवाने सुरक्षा रक्षकाला कुठलीही दुखापत झाली नाही. ही घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास पुनम चेंबर्स येथे घडली. याप्रकरणात माजी मंत्र्याचा मुलगा आरोपी असल्याने घटनेच्या २४ तासानंतरही पोलीस कारवाई करण्यास असमर्थ ठरले आहेत. याप्रकरणी सदर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर परिसरातील पुनम चेंबर्स येथे समीर कालिदास चक्रवर्ती (५५) हा सुरक्षा रक्षक कर्तव्यावर असताना, शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास चेंबरच्या मेनगेट समोर एमएच-३१-७७२२ या वाहनाने पार्किंग केले. सुरक्षा रक्षकाने वाहन चालकाला पार्किंग करण्यास मज्जाव केला. त्यावेळी वाहनचालकासोबत एक महिला होती. त्यामुळे चिडलेल्या वाहनचालकाने सुरक्षा रक्षकाशी वाद घातला. चेंबरच्या मालकाशी ओळख असल्याचा हवाला देत, कार येथेच पार्किंग करतो, असे सांगून एका व्यक्तीला फोनही केला. कुणीतरी मोठा व्यक्ती आहे हे लक्षात येताच सुरक्षा रक्षक शांत झाला. काही वेळानंतर वाहनचालक त्या महिलेला घेऊन निघून गेला.
त्यानंतर रात्री १ वाजताच्या सुमारास वाहनचालक पुन्हा पुनम चेंबर्स जवळ आला. सुरक्षा रक्षकाला तो शिवीगाळ करू लागला. त्याला मारहाणही केली. स्वत:जवळील पिस्तूल काढून सुरक्षा रक्षकावर ताणले. जीवे मारण्याची धमकी देऊन सुरक्षा रक्षकाच्या बाजूला गोळी झाडून पसार झाला. सुरक्षा रक्षकाने या प्रकरणाची सुचना एजन्सीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सदर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत भादंविच्या कलम ५०६(ब), ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलीस रात्रीच माजी मंत्र्याच्या सिव्हिल लाईन येथील घरी धडकल्याचे सूत्रांची माहिती आहे. सुरक्षा रक्षकाने केलेल्या आरोपीच्या वर्णनावरून तो ४० ते ४५ वर्षाचा आहे. तो माजी मंत्र्याचा मुलगा असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तो रात्री घरी नसल्याने पोलीस रिकाम्या हाताने परतले. सूत्राच्या अनुसार आरोपी ज्या कारमध्ये आला होता त्या क्रमांकाची कार माजी पालकमंत्र्यांजवळ आहे. तसेच त्यांच्याजवळ शस्त्र बाळगण्याचा परवानाही आहे. (प्रतिनिधी)
पोलीस अधिकारी गप्प
या प्रकरणात शहरातील एका माजी मंत्र्याच्या मुलाचा समावेश असल्याने सदर पोलीस व वरिष्ठ अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. सदरचे पोलीस निरीक्षक रफीक बागवान यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही तर डीसीपी संजय लाटक र मिटींगमध्ये असल्याचे सांगून त्यांनी बोलणे टाळले.

Web Title: Firing by a former minister's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.