स्टील कारखान्यासह चार ठिकाणी आग
By Admin | Updated: October 5, 2015 02:56 IST2015-10-05T02:56:04+5:302015-10-05T02:56:04+5:30
शहर व परिसरात गेल्या २४ तासात स्टील साहित्याच्या कारखान्यासह वेगवेगळ्या चार ठिकाणी लागलेल्या आगीत ट्रकसह घरगुती सामानाचे नुकसान झाले.

स्टील कारखान्यासह चार ठिकाणी आग
अग्निशमन विभाग : ट्रकसह घरगुती सामानाचे नुकसान
नागपूर : शहर व परिसरात गेल्या २४ तासात स्टील साहित्याच्या कारखान्यासह वेगवेगळ्या चार ठिकाणी लागलेल्या आगीत ट्रकसह घरगुती सामानाचे नुकसान झाले.
एमआयडीसी येथील फेरो आॅईल व स्टील तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे उत्पादन करणाऱ्या मॅरेन्डो माईनिक्स मॅटालॉजी कंपनी लि.च्या शेडला शनिवारी सकाळच्या सुमारास आग लागली. थोड्याच वेळात आगीने भीषण रूप धारण केले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला सूचना मिळाल्यानंतर तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. दुपारी १ च्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीचे कारण व नुकसानीची माहिती मिळू शकली नाही. दुसरी घटना शनिवारी सकाळी कळमना भागातील कावरापेठ उड्डाण पुलाजवळील राजीव गांधी नगर येथे घडली. येथील निवासी नवीन हुसेन यांच्या घराला शॉट सर्किटमुळे आग लागली. त्यांच्या घरी शुक्रवारी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे मंडप व प्लास्टिकचे सामान घरात ठेवण्यात आले होते. आगीत सामानाचे नुकसान झाले. अंबाझरी मार्गावरील शंकरनगर येथील अॅक्सिस बँकेवळील नर्सरीला आग लागली. यात शेड, पंखे व फर्निचरचे नुकसान झाले.
तसेच रविवारी सकाळी १० च्या सुमारास गिट्टीखदान भागातील दीपकनगर येथे उभा असलेला एमएच ४०/एम ७३१३ क्रमांकाचा ट्रक आगीत जळून खाक झाला. हा ट्रक कळमना येथील बोन्द्रे ट्रान्सपोर्टचा असल्याची माहिती आहे. ट्रकचालक राजकुमार इवनाते यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास हा उभा केला होता. आगीचे कारण कळू शकले नाही.(प्रतिनिधी)