सीबीआय कार्यालयाला आग. महत्त्वपूर्ण दस्तऐवज सुरक्षित

By Admin | Updated: August 6, 2015 02:37 IST2015-08-06T02:37:31+5:302015-08-06T02:37:31+5:30

केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (सीबीआय) नागपूर कार्यालयाला बुधवारी पहाटे आग लागली.

Fire to CBI office Important documents are protected | सीबीआय कार्यालयाला आग. महत्त्वपूर्ण दस्तऐवज सुरक्षित

सीबीआय कार्यालयाला आग. महत्त्वपूर्ण दस्तऐवज सुरक्षित

कॉम्प्युटर रूममध्ये शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज
नागपूर : केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (सीबीआय) नागपूर कार्यालयाला बुधवारी पहाटे आग लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातील सर्व कागदपत्रे सुरक्षित आहेत. सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या माळ्यावर सीबीआय कार्यालय आहे. या ठिकाणी नेहमीच सशस्त्र पोलिसांचा पहारा असतो. मंगळवारी रात्री शिपाई राजेश पाली, विजय मेहर आणि दयाप्रसाद वर्मा ड्युटीवर कार्यरत होते. सकाळी ६.१५ च्या दरम्यान राजेश पाली यांना सर्व्हर रुममधून धूर निघताना दिसून आला. जवळ जाऊन पाहिले असता आग लागल्याचे लक्षात आले. राजेशने तत्काळ नियंत्रण कक्षाला सूचना दिली. नियंत्रण कक्षाच्या सूचनेवरून अग्निशमन दल वाहनांसह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कार्यालयाचा दरवाजा उघडताच आतील धूर सर्वत्र पसरला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना काहीच दिसत नव्हते. सीबीआय कार्यालयाला लागूनच केंद्रीय जल आयोगाचे कार्यालयसुद्धा आहे. अशा स्थितीत केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयालाही आग लागण्याची शक्यता होती. दरम्यान सीजीओ कॉम्प्लेक्समधील इलेक्ट्रिशियन विजय शेरबहादूर ठाकूर वीजपुरवठा बंद करण्यासाठी तिथे आला. अग्निशमन दलाचे नेतृत्व करीत असलेले सुनील डोकरे यांनी धूर असल्याचा हवाला देत ठाकूरला परत जाण्याचा सल्ला दिला. परंतु ठाकूर यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत वीजपुरवठा बंद करण्यासाठी सर्व्हर रूमच्या दिशेने निघाले. पाच मिनिटातच वाचवा-वाचवा म्हणून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. परंतु कार्यालयात खूप धूर असल्याने काहीच दिसत नव्हते. अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता कार्यालयात प्रवेश केला. डोकरे यांनी त्याला ओढत कार्यालयाबाहेर आणले. अग्निशमन दलाचे जवान कार्यालयाच्या मागच्या बाजूने पाण्याचा मारा करीत होते. दरम्यान सीबीआयचे एसपी संदीप तामगाडगे, अपर आयुक्त श्रीकांत तरवडे, डीसीपी रंजन शर्मा, दीपाली मासिरकर, संजय लाटकर सुद्धा घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने तब्बल तीन तास परिश्रम करून आग आटोक्यात आणली. प्राथमिक चौकशीच शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सर्व्हर रूमधील एसी नेहमीच सुरू असतो. तिथे चारही बाजूंनी विजेच्या ताराचे जाळे पसरले असल्याने शॉर्ट सर्किट झाल्याची शंका आहे. आगीमध्ये कार्यालयातील पंखे, कॉम्प्युटरसह काही फर्निचर जळाले. सीबीआय सूत्रांनुसार महत्त्वपूर्ण दस्तऐवज ‘स्ट्राँग रुम’मध्ये ठेवण्यात आले आहे. स्ट्राँग रुम सुरक्षित आहे. झोन दोनचे डीसीपी संजय लाटकर यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शंका आहे. बहुतांश महत्त्वपूर्ण दस्तऐवज सुरक्षित आहेत. पाहणी केल्यानंतरच नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट करता येईल. (प्रतिनिधी)
सर्व कागदपत्रे सुरक्षित - संदीप तामगाडगे
या आगीबद्दल लोकमतशी बोलतांना सीबीआय नागपूरचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांनी सांगितले की, या आगीसंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. प्राथमिक अंदाजानुसार कॉम्प्युटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, परंतु सविस्तर गोष्टी पोलीस तपासानंतरच स्पष्ट होतील. या आगीत सीबीआय कार्यालयातील फर्निचर व कॉम्प्युटर जळाले. इतरही नुकसान झाले. परंतु कार्यालयातील सर्व कागदपत्रे सुरक्षित आहेत. आगीमुळे प्रचंड नुकसान झाले असले तरी कार्यालयाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असेही तामगाडगे यांनी स्पष्ट केले.
देवदूत धावून आला
या आगीत बचावलेले इलेक्ट्रीशियन विजय ठाकूर यांच्यानुसार त्यांना वाचवण्यासाठी सुनील डोकरे यांच्या रूपात साक्षात देवदूत धावून आला. ठाकूर यांना त्यांचा मृत्यू समोर दिसत होता. ते जोरजोराने ओरडत वाचवण्यासाठी याचना करीत होते. आग आणि धुरामुळे काहीच दिसन नव्हते आणि ऐकूही येत नव्हते. डोकरे यांनी जेव्हा त्यांना पकडले तेव्हा दोघांनाही बाहेर जाण्याचा मार्गच दिसत नव्हता. त्यांना अचानक एका ठिकाणांहून प्रकाश दिसून आला. त्या ठिकाणी लिफ्ट लावण्याचे काम सुरू होते. त्या मोकळ्या जागी मजुरांनी चैली बांधली होती. डोकरे यांनी चैलीच्या मदतीने अगोदर ठाकूर यांना दुसऱ्या माळ्यावर आणले आणि नंतर ते स्वत: आले.

Web Title: Fire to CBI office Important documents are protected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.