तारसा शिवारात अग्नितांडव

By Admin | Updated: April 23, 2016 03:07 IST2016-04-23T03:07:05+5:302016-04-23T03:07:05+5:30

उन्हाचा पारा वाढत असतानाच ग्रामीण भागात आगीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास

Fire brigade in Tarsa Shivar | तारसा शिवारात अग्नितांडव

तारसा शिवारात अग्नितांडव

जीवितहानी टळली : जनावरांचे वैरण व शेतीपयोगी साहित्याची राख
तारसा : उन्हाचा पारा वाढत असतानाच ग्रामीण भागात आगीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मौदा तालुक्यातील तारसा शिवारातील तारसा - इसापूर मार्गालगतच्या शेतांमधील पालापाचोळ्याने पेट घेतला. हवा जोरात वाहात असल्याने शेतकऱ्यांना या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे या आगीत शेतांमधील तणसाचे ढीग, पीव्हीसी, एचडीपीई व रबरी पाईप, शेतांमधील झोपडी, टीनपत्रे यासह शेतीपयोगी साहित्याची राख झाली. यात अंदाजे ६० ते ६५ शेतकऱ्यांचे एकूण लाखो रुपयांचे नुकसान झाले.
तारसा येथील बहुतेकांची शेती तारसा - इसापूर मार्गालगत तसेच बाबदेव शिवारातील सांड नदी ते पिपळा मायनर परिसरात आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी तारसा - इसापूर मार्गावरील शेतातील कचऱ्याने पेट घेतला. सुरुवातीला याकडे कुणाचेही लक्ष न गेल्याने आगीने अल्पावधीतच उग्र रूप धारण केले. याच काळात हवा जोरात वाहात असल्याने तसेच प्रत्येक शेतात धानाच्या तणसाचा कचरा असल्याने ही आग झपाट्याने पसरत गेली. आग लागल्याचे लक्षात येताना नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, जोराच्या हवेमुळे ही आग नियंत्रणात आली नाही.
याचवेळी परिसरातील अंदाजे ३० ते ३५ शेतांमध्ये जनावरे चरत होती. ही सर्व जनावरे मोकळी असल्याने त्यांनी आगीची झळ पोहोचताच पळ काढला. त्यामुळे आगीत कोणतीही प्राणहानी झाली नाही. परंतु, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांमधील शेतीपयोगी साहित्य उचलणे शक्य झाले नाही. त्यामुळे तारसा येथील चांगदेव गिरडकर यांच्या शेतातील गोठा, गोठ्यावरील ५५ टीनपत्रे, ६० पीव्हीसी पाईप, पाच बॅग सोडा तसेच इतर शेतीपयोगी साहित्य खाक झाले. याशिवाय, गिरडकर यांच्या शेतालगत असलेल्या मंगेश देशमुख, जानबा समर्थ, शिवाजी बोपुट्टी, राजू आंबिलडुके, नरेंद्र देशमुख, जालीम पटिये, शेखर हारोडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतांमधील तणसाचे ढीग व इतर साहित्याची राख झाली.
विशेष म्हणजे, या भागात तणसाचा वापर जनावरांचा चारा म्हणून केला जातो. या आगीने तारसा - इसापूर तसेच बाबदेव शिवारातील सांड नदी ते पिपळा मायनर दरम्यानची शेती कवेत घेतली होती. हा संपूर्ण परिसर किमान एक कि.मी. आहे. शेतकऱ्यांनी या आगीची माहिती मौदा पोलीस तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. जोरात वाहणाऱ्या हवेमुळे ही आग रात्रीपर्यंत धुमसत होती. (वार्ताहर)

Web Title: Fire brigade in Tarsa Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.