खंडणीबाज फॅशन डिझायनरच्या साथीदारांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST2021-06-18T04:07:14+5:302021-06-18T04:07:14+5:30

एक कोटीच्या खंडणी वसुलीचे प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, ...

Finding the Companions of the Ransom Fashion Designer | खंडणीबाज फॅशन डिझायनरच्या साथीदारांचा शोध

खंडणीबाज फॅशन डिझायनरच्या साथीदारांचा शोध

एक कोटीच्या खंडणी वसुलीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी धमकविणारी फॅशन डिझायनर शीतल इटनकर हिच्या साथीदारांचा शोध आता पोलीस घेत आहेत. बेलतराेडी पोलिसांना अशी शंका आहे की, शीतलसोबत आणखी काही लोकही यात सहभागी असू शकतात. पोलिसांनी यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेजही प्राप्त केले आहेत.

बेलतराेडी पोलिसांनी बुधवारी सकाळी ४५ वर्षीय शीतल इटनकर हिला अटक करून, हे प्रकरण उघडकीस आणले.

शीतलचा पती एका शासकीय विभागात अभियंता पदावर कार्यरत आहे. त्याला दीड लाख रुपये वेतन मिळते. त्यांनी ५० लाख रुपयांचे कर्ज घेऊन घर बांधले. दर महिन्याला ६० हजार रुपयांची किस्त जाते. उर्वरित पैशात घरखर्च भागत नाही. यामुळे फॅशन डिझायनर असलेल्या शीतलला बुटीक सुरू करायचे होते. पतीने पैसे न दिल्याने नात्यात दुरावा निर्माण झाला होता. सप्टेंबर-२०२० मध्ये कोरोना उपचारासाठी इटनकर दाम्पत्य मनीषनगरातील डॉ. तुषार पांडे यांच्या रुग्णालयात होते. डॉ. पांडे यांच्या पत्नीदेखील चिकित्सक आहेत. पांडे दाम्पत्याच्या प्रॅक्टिसवरून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा अंदाज शीतलला आला होता. त्यांना दोन मुले असल्याचे फेसबुक अकाऊंटवरून तिने शोधले होते. त्या मुलांचे अपहरण करून रक्कम उकळण्याची योजना तिने आखली.

ही योजना अमलात आणण्यासाठी १० जूनला कुरिअरच्या माध्यमातून धमकीपत्र पाठविले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ते डॉ. पांडे यांना मिळाले. पत्रात दोन्ही मुलांचे अपहरण करण्याची धमकी देऊन प्रत्येकाच्या बदल्यात ५०-५० लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम १७ जूनच्या पहाटे नरेंद्रनगरातील एका निर्जन ठिकाणी ठेवण्याची सूचना देऊन असे न केल्यास मुलांची हत्या करण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर पोलिसांना कळविल्यास गंभीर परिणाम होतील, असाही इशारा दिला होता.

या पत्रामुळे डॉ. पांडे यांनी ११ जूनलाच बेलतरोडी पोलिसात तक्रार नोंदविली. याच दिवशी १५ वर्षाच्या राज पांडे या मुलाची हत्या झाल्याने पोलीस यंत्रणा सावध झाली. पत्राचा धागा पकडून पोलिसांनी शोध सुरू केला. ओंकारनगरातील एका कुरिअर सेंटरवरून ते पाठविण्यात आले होते. १० जूनला कुरिअरमधून पाठविण्यात आलेल्या सर्व ग्राहकांचे पत्ते मिळवून पोलिसांनी प्रत्येक ग्राहकांकडे चौकशी केली. शीतलने नाव आणि पत्ता खोटा दिल्याने पोलीस तिच्यापर्यंत पोहचू शकले नाही. परिसरातील सीसीटीव्ही तपासणीत मोपेडवरील एक महिला संशयास्पद स्थितीत दिसली. तिचा शोध घेत पोलीस रामटेकेनगरात पोहचले. मोपेडच्या क्रमांकावरून या महिलेचे नाव पोलिसांनी मिळविले. रामटेकेनगर आणि रक्कम ठेवण्यास सुचविलेल्या नरेंद्रनगराच्या मध्ये शीतलचे घर आहे. यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

पोलीस निरीक्षक विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलिसांनी बुधवारी सकाळी शीतलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्हा कबूल केला. खंडणीची रक्कम मिळाली नाही तर पुढे काय, यासंदर्भात कोणतीही योजना नसल्याचे ती सांगत आहे. यात तिच्यासोबत दुसरे कुणीही सहभागी नसल्याचे तिचे म्हणणे आहे, परंतु पोलिसांना यावर विश्वास नाही. तिच्यासोबत यात आणखीही कुणी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस शीतलचे मित्र व साथीदारांचाही शोध घेत आहेत.

...

Web Title: Finding the Companions of the Ransom Fashion Designer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.