शाळेत मंदिर शोधा ‘राम’ मिळेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:27 AM2018-07-02T11:27:44+5:302018-07-02T11:28:03+5:30

सोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?

Find 'Ram' in the school! | शाळेत मंदिर शोधा ‘राम’ मिळेल !

शाळेत मंदिर शोधा ‘राम’ मिळेल !

googlenewsNext

जितेंद्र ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?
हायकोर्टाच्या आदेशानंतर नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर महापालिकेच्या वतीने बुलडोजर चालविला जात आहे. मात्र मंदिर तोडणे हा हिंदू धर्मावर आघात असल्याचे कारण देत भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेविरुद्ध बजरंग दलाचे ‘हनुमान’ मैदानात उतरले आहेत!
गोरगरीब विद्यार्थ्यांचे मंदिर आणि श्रद्धास्थान असलेल्या महापालिकेच्या ३५ शाळा बंद पडल्या तरी याविरुद्ध ना बजरंग दलाने लोकआंदोलन उभे केले ना मराठीचा लळा असलेल्या शिवसेना आणि मनसेने! मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात कृती समितीची उभारणी झाली. या समितीत बोटावर मोजण्याइतक्याच लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे बंद पडलेल्या मराठी शाळांचा जीर्णोद्धार करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेली कृतीही तितकीच ‘शून्य’ आहे.
देशात, राज्यात आणि नागपुरात सत्ता असलेल्या भाजपचा डिजिटलायझेशनवर भर आहे. ‘स्टार्ट अप इंडिया’च्या माध्यमातून सरकारने विकासाचा मंत्र दिला आहे. मात्र १५ वर्षांची सत्ता उपभोगूनही भाजपला बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळा ‘स्टॅण्ड अप’ का करता आल्या नाही ? याबाबत मन की बात करण्यासाठी भाजपचा एकही नेता पुढे येत नाही. चार वर्षांत ४,१६१ विद्यार्थी कमी होणे. त्यामुळे ३५ शाळा बंद पडणे ही बाब ‘इनोव्हेटिव्ह सिटी’चा नंबर १ पुरस्कार पटकाविणाऱ्या नागपूरसाठी निश्चितच लाजिरवाणी आहे. त्यामुळे महापालिका आणि सरकार सीबीएसई शाळामालकांच्या समर्थनात तर नाही ना, असा कुणी आरोप केल्यास तो चुकीचा ठरेल का? बंद पडलेल्या मनपा शाळांच्या जीर्णोद्धारासाठी भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार, ज्येष्ठ गोंधीवादी विचारवंत लीलाताई चितळे कृती समितीच्या आंदोलनात दिसल्या. मात्र या आंदोलनाला लोकांचा फारसा पाठिंबा मिळाला नसल्याने सत्ताधाऱ्यांनी आणि सीबीएसईवाल्यांनी यात ‘आनंद’ मानला. पालिकेप्रमाणे जि.प. शाळांची हीच अवस्था आहे. राज्यात आजही काही अशा सरकारी शाळा आहेत, त्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे ‘कुलदैवत’ आहेत. यात पंढरपूरच्या पांढरेवस्ती येथील जि.प.शाळेचा नंबर लागतो. ही शाळा ३६५ दिवस सुरू असते. रविवारची सुटी नसते. औरंगाबादच्या सांजखेडा येथील जि.प. शाळाही त्यातलीच एक आहे.
सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्याला लाजवेल त्यापेक्षाही चांगले इंग्रजी या शाळेचे विद्यार्थी बोलतात. पंढरपूर, औरंगाबाद आणि भंडारा जिल्ह्यातील खराशीच्या जि.प. शाळात हे शक्य आहे तर ‘इनोव्हेटिव्ह’ आणि स्मार्ट नागपुुरात हे का होत नाही ?
शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्यास नागपुरात दानदात्यांचीही कमतरता नाही. गिरीश गांधींसारख्या सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतल्यास तासाभरात हे होऊ शकते. शिर्डीच्या साई संस्थानने एका झटक्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी ७१ कोटींचे दान दिले. कोट्यवधीच्या दानाच्या बळावर नागपुरातही टेकडीच्या गणेशाला सोन्याचा मुकुट चढवून जीर्णोद्धार केला जात आहे. लोकसभा तोंडावर आल्याने यूपीत योगी आदित्यनाथांनी ‘राम’जप सुरू केला आहे. मात्र महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत?

Web Title: Find 'Ram' in the school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा